औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 04:23 PM2020-08-23T16:23:41+5:302020-08-23T16:23:46+5:30

मागील चार महिन्यांपासून आरोग्य निरीक्षकांनी यासंदर्भातील माहिती संकलित केली नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

Corporation has no information about drug buyers! | औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही!

औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने शहरात औषध विक्रीच्या दुकानांमधून औषध खरेदी करणाºया ग्राहकांची माहिती जमा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी औषध विक्रेत्यांसह आरोग्य निरीक्षकांना (एसआय) दिले होते. आयुक्तांच्या निर्देशांना ठेंगा दाखवत मागील चार महिन्यांपासून आरोग्य निरीक्षकांनी यासंदर्भातील माहिती संकलित केली नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन विविध प्रकारे उपाय योजना करीत आहे. महापालिकेच्या उत्तर झोनमध्ये सात एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व खासगी रुग्णालये तसेच क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णांची नोंद ठेवण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले होते. तसेच औषधी खरेदीसाठी येणाºया नागरिकांची औषध व्यावसायिकांनी नोंद ठेवून सदर माहिती जमा करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर सोपवण्यात आली होती. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन आता चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरीही आजपर्यंत आरोग्य निरीक्षकांनी औषधी खरेदी करणाऱ्यांची माहिती जमा केली नसल्याचे समोर आले आहे. यानिमित्ताने आरोग्य निरीक्षकांचा हेकेखोरपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.


औषधी विके्रत्यांकडून माहिती घेणार का?
शहरात औषधी विके्रत्यांची मोठी संख्या आहे. या ठिकाणी केवळ किरकोळ ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास संबंधित प्रकारची औषधी खरेदी करणाºया व्यक्तींचा नावासहित भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवण्याचे निर्देश औषधी विक्रेत्यांना दिले होते. काही निवडक औषधी व्यावसायिक वगळता बहुतांश सर्व व्यावसायिकांनी ग्राहकांची नोंद घेण्याकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे. संबंधित विके्रत्यांकडून महापालिका ही माहिती घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.


तपासणीशिवाय औषध खरेदी
शहरातील नागरिक त्यांना किरकोळ ताप, सर्दी किंवा खोकला आल्यास ते रुग्णालयांमध्ये न जाता थेट औषधी विक्रीच्या दुकानांवर जाऊन औषधी खरेदी करीत असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. अशा नागरिकांची नोंद ठेवण्याचे निर्देश मनपाने संबंधित औषधी विक्रेत्यांना दिले होते, हे विशेष.


प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
मनपाच्या आरोग्य विभागात काही बोटावर मोजता येणारे आरोग्य निरीक्षक (एसआय) वगळल्यास इतर निरीक्षक झोन अधिकाºयांनाही जुमानत नसल्याची परिस्थिती आहे. कामात कुचराई करणाºया ‘एसआय’ विरोधात कारवाई प्रस्तावित केल्यास कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केला जातो. अशा कामचुकार व मुजोर ‘एसआय’च्या विरोधात प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Web Title: Corporation has no information about drug buyers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.