मनपाचे अधिकारी ‘नाॅटरिचेबल’; अकाेलेकर वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:11+5:302020-12-11T04:45:11+5:30
महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी उपायुक्त वैभव आवारे, पूनम कळंबे यांच्यावर कामाचा ताण येत ...
महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी उपायुक्त वैभव आवारे, पूनम कळंबे यांच्यावर कामाचा ताण येत आहे. आज राेजी मनपातील दाेन्ही उपायुक्तपदे, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखाधिकारी, सहायक संचालक नगररचनाकार, नगररचनाकार, कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग, शहर अभियंता तसेच करमूल्यांकन अधिकारी यांसह विविध महत्त्वाची पदे रिक्त आहेत. दाेन्ही उपायुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार सहायक आयुक्त वैभव आवारे, पूनम कळंबे यांच्याकडे साेपविण्यात आला. आज राेजी प्रशासकीय कारभाराची सर्व धुरा या दाेन्ही उपायुक्तांच्या खांद्यावर दिसून येते. अशा स्थितीत या दाेन्ही अधिकाऱ्यांनी दीर्घ रजा घेतल्यास प्रशासनाचे संपूर्ण कामकाज विस्कळीत हाेत असल्याची परिस्थिती आहे. मागील सहा ते सात दिवसांपासून सदर दाेन्ही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनाचे कामकाज खाेळंबले आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आयुक्तांची अनुपस्थिती
गत आठवड्यात मनपा आयुक्त संजय कापडणीस ‘युनिफाईड डीसी रूल’च्या परिषदेनिमित्त मुंबईत हाेते. त्यानंतर ते पाच दिवस मनपात दाखल झालेच नाहीत. आयुक्तांनी मनपात साेमवारी, मंगळवारी दाखल हाेत वित्त व लेखा विभागाचा आढावा घेतल्यानंतर बुधवारपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच थांबणे पसंत केले आहे.