‘कोविड केअर’मध्ये सुविधा देण्याची जबाबदारी मनपाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:04 AM2020-06-01T10:04:54+5:302020-06-01T10:05:07+5:30
मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब उजेडात आल्यानंतर मनपा प्रशासनाच्या पातळीवर दैनंदिन स्वच्छता, विद्युत तसेच पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुरळीत ठेवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला : शहरात आढळून येणारे कोरोनाबाधित रुग्ण तसेच संशयित रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात व्यवस्था केली. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब उजेडात आल्यानंतर मनपा प्रशासनाच्या पातळीवर दैनंदिन स्वच्छता, विद्युत तसेच पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुरळीत ठेवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांना मुक्कामी ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कोविड केअर सेंटरचे गठन करण्यात आले. संशयित रुग्णांचे नमुने घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना घरी न ठेवता पीडीकेव्ही परिसरात क्वारंटीन करण्याच्या प्रस्तावाला २७ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली. त्याअनुषंगाने २६ मे रोजी रात्री मनपाच्या भरतीया रुग्णालयातील नमुने घेण्याचे केंद्र बंद करीत ते पीडीकेव्ही परिसरात हलविण्यात आले. या ठिकाणी २८ मेपासून संशयित रुग्णांचे नमुने घेण्यास सुरुवात केली जाणार होती. प्रत्यक्षात ही व्यवस्था सुरू न झाल्यामुळे २८ मे रोजी अकोट फैल व तारफैल भागातील रुग्णांना दिवसभर ताटकळत ठेवल्यानंतर सायंकाळी घरी परत जावे लागले होते. हा प्रकार कमी म्हणून की काय २९ मे रोजी रात्री दक्षिण झोनमधील अठरा संशयित रुग्णांच्या मुक्कामाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे संबंधित संशयित रुग्णांनी घरी परत जाणे पसंत केले होते.
या प्रकाराची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कृषी विद्यापीठातील सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये मूलभूत सुविधा राखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे सोपविण्यात आली.
स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई
कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यासाठी मनपाच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित इमारतीमधील स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई केली जाणार असून, मनपाच्या विद्युत यंत्रणेच्या वतीने इमारतीमधील नादुरुस्त पंखे, लाइट आदी साहित्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
इमारतीमधील प्रत्येक खोलीत तसेच स्वच्छतागृहांमध्ये दैनंदिन साफसफाई राखणे, विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच पाणीपुरवठ्याच्या संदर्भात यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा