मनपाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा खेळखंडाेबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:02+5:302021-06-11T04:14:02+5:30
पावसाळ्यात नैसर्गिक संकटाची शक्यता लक्षात घेता मनपाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाने सज्ज असणे अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार ...
पावसाळ्यात नैसर्गिक संकटाची शक्यता लक्षात घेता मनपाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाने सज्ज असणे अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येत आहे. १८ मे राेजी शहरात वादळामुळे माेठ्या प्रमाणात वित्त हानी झाली हाेती. त्यावेळी अग्निशमन विभागाच्या मर्यादा समाेर आल्या हाेत्या. त्यानंतर या विभागाने प्रभावी उपाययाेजना करण्याची गरज असताना हा विभाग कमालीचा गाफील असल्याचा अनुभव खुद्द माजी महापाैर विजय अग्रवाल यांना आला आहे. ही बाब गंभीरतेने घेत महापाैर अर्चना मसने यांनी आयुक्त अराेरा यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसाेबत बैठकीत चर्चा केली. बैठकीत माजी महापौर अग्रवाल, सभापती संजय बडोणे, सभागृहनेता याेेगिता पावसाळे, नगरसेविका उषा विरक, उपायुक्त डॉ. पंकज जावळे, सहा. आयुक्त पूनम कळंबे, माजी नगरसेवक जयंत मसने, क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, विठ्ठल देवकते, देवीदास निकाळजे, राजेंद्र टापरे, अग्निशमन विभागाचे मनीष कथले आदींची उपस्थिती होती.
साहित्याची खरेदी करा !
आपातकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी अग्निशमन विभागाने तातडीने आवश्यक साहित्याची खरेदी करण्याचे निर्देश महापाैरांनी दिले. यामध्ये कटर, पंप, इन्व्हर्टर, जनरेटर, हॅण्ड ग्लोज, गम बूट, टॉर्च, डिझेल पंप यासह इतर साहित्यांचा समावेश आहे.
चार वर्षांनंतर पाेकलेन खरेदीचा प्रस्ताव
नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचरा बाजूला करण्यासाठी २०१७ मध्ये सत्तापक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने पाेकलेन मशीन भाडेतत्त्वावर नियुक्त केली हाेती. या माेबदल्यात आजवर प्रशासनाने ४ काेटी रुपयांपेक्षा अधिक देयक अदा केले आहे. चार वर्षांनंतर मनपाने नवीन पाेकलेन मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव महापाैरांनी या बैठकीत मांडला, हे येथे उल्लेखनीय.