नगरसेवकाने उचलला मृतदेह; प्रशासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:07 AM2020-05-10T10:07:21+5:302020-05-10T10:07:29+5:30
महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेने टाळाटाळ केल्याची बाब शनिवारी समोर आली.
अकोला: संपूर्ण शहरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असताना यादरम्यान अचानक मृत्यू झालेल्या प्रभाग क्रमांक १३ मधील एका इसमाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेने टाळाटाळ केल्याची बाब शनिवारी समोर आली. अखेर प्रभागाचे नगरसेवक अनिल मुरूमकार व मृतकाचा भाऊ या दोघांनी सदर इसमाचा मृतदेह सर्वोपचारमध्ये दाखल केला असून, त्याचे नमुने घेण्याची मागणी केली आहे.
एका इसमाचा ८ मे रोजी रात्री अचानक मृत्यू झाला. कोरोनाच्या धास्तीमुळे त्यांच्या मृतदेहाला कोणीही हात लावायला तयार होत नसल्याचे पाहून प्रभागातील भाजपचे नगरसेवक अनिल मुरूमकार यांनी यासंदर्भात महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेला माहिती दिली. तीनही प्रशासकीय यंत्रणेकडून मृतदेहाला उचलण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे समोर आल्यानंतर अखेर नगरसेवक मुरूमकार व मृतकाचा भाऊ या दोघांनी हा मृतदेह उचलून सर्वोपचार रुग्णालयात आणला. या मृतदेहाचे नमुने घेऊन ते तपासण्याची विनंतीवजा मागणी नगरसेवक अनिल मुरूमकार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.
रहिवाशांमध्ये धाकधूक; नमुने घेणार का?
प्रभाग क्रमांक १३ मधील सुधीर कॉलनीलगतच्या रवी नगरमध्ये तसेच शिवर येथील ढोणे कॉलनीमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे द्वारका नगरी भागातील रहिवाशांमध्ये धाकधूक वाढली आहे. ही बाब पाहता जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन रुग्णाचा नमुना घेऊन तो तपासणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.