रस्त्याच्या निकृष्ट कामावर आक्षेप घेतला म्हणून नगरसेविकेच्या पतीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:26 AM2021-02-04T10:26:35+5:302021-02-04T10:26:41+5:30
Akola News कंत्राटदाराने विनवणी केल्यामुळे पाेलिसात तक्रार दाखल न करता प्रकरण आपसात मिटविण्यात आले.
अकाेला: रस्त्याचे दर्जाहिन बांधकाम करणाऱ्या मजुरांना हटकले असता, त्यांनी नगरसेविकेच्या पतीला मारहाण केल्याची घटना बुधवारी जुने शहरात घडली. या प्रकरणी कंत्राटदाराने विनवणी केल्यामुळे पाेलिसात तक्रार दाखल न करता प्रकरण आपसात मिटविण्यात आले. महापालिकेची हद्दवाढ झाल्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाने ९६ काेटी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. प्राप्त निधीतून दर्जेदार रस्ते, नाल्या, बगिच्याचे साैंदर्यीकरण, तसेच जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या कामाचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून डाबकी राेड भागातील हद्दवाढ क्षेत्रात रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. या रस्त्यांचा दर्जा अतिशय सुमार असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. प्रभागांमधील नगरसेवकांनी या मुद्द्यावर आक्षेप घेणे अपेक्षित असताना सर्वांनीच मौन साधणे पसंत केेले आहे. नागरिकांची नाराजी लक्षात घेता, बुधवारी डाबकी राेड भागातील एका नगरसेविकेच्या पतीने रस्त्याच्या कामावर आक्षेप घेतला. त्यावेळी कामावर असलेल्या मजुरांसाेबत शाब्दिक बाचाबाचीत रूपांतर हाणामारीत झाले. मजुरांनी नगरसेविकेच्या पतीला मारहाण केल्याचे समजताच, सुसंकृत व शिस्तप्रिय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने घडल्या प्रकरणाची माफी मागितल्याने, हे प्रकरण आपसांत मिटविण्यात आल्याची माहिती आहे.