शिक्षकांच्या बदल्यांसाठी नगरसेवकांची ‘सेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 02:49 PM2019-04-03T14:49:13+5:302019-04-03T14:49:28+5:30

मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी शिक्षण विभागात ‘सेटिंग’ सुरू केली असून, अनेकांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे.

 Corporators' setting for transfers of teachers | शिक्षकांच्या बदल्यांसाठी नगरसेवकांची ‘सेटिंग’

शिक्षकांच्या बदल्यांसाठी नगरसेवकांची ‘सेटिंग’

Next

अकोला: महापालिक ा शाळेसाठी विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्याला काही कामचुकार शिक्षकांनी नेहमीच बाजूला सारले आहे. यंदा लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत. घराजवळ असणाऱ्या अपेक्षित शाळेत बदली करून घेण्यासाठी चक्क लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी शिक्षण विभागात ‘सेटिंग’ सुरू केली असून, अनेकांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे.
शहरातील खासगी कॉन्व्हेंटच्या महागड्या शिक्षणाला पर्याय म्हणून महापालिकेच्या शाळांकडे पाहिल्या जाते. कधीकाळी मनपाच्याच शाळेमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पुढे यशाचे झेंडे रोवल्याचे कोणीही नाकारत नाही. यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिक्षक व शिक्षक संघटनांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेच्या शिक्षण प्रणालीला घरघर लागल्याचे चित्र आहे. घराजवळ असणाºया शाळेत मागील १५-१५ वर्षांपासून काही शिक्षकांनी ठाण मांडले होते. अपेक्षित शाळेवर बदली करून घेण्यासाठी व झालेली बदली थांबविण्यासाठी शिक्षक संघटना सर्रासपणे आर्थिक व्यवहार करीत होते. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी २०१६ मध्ये १५ ते २० वर्षांपासून एकाच शाळेत कार्यरत असणाºया ७६ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये एकाच शाळेवर ५ ते १० वर्षांपर्यंत कार्यरत राहणाºया ७४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या बदल्या रद्द करून पुन्हा अपेक्षित शाळांमध्ये रुजू होण्यासाठी काही शिक्षकांना वेध लागले असून, नगरसेवकांच्या माध्यमातून शिक्षण विभागावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची खमंग चर्चा रंगली आहे.

शिक्षण विभागात शिफारशींचा पाऊस
मनपा प्रशासनाने मागील दोन वर्षांत राबविलेली रीतसर बदली प्रक्रिया अनेक शिक्षकांच्या पचनी पडली नसल्याचे चित्र आहे. उण्यापुºया दोन वर्षांच्या कालावधीतच अस्वस्थ झालेल्या सुमारे १९ शिक्षक व शिक्षिकांनी नगरसेवकांच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे बदलीचे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
काही शाळांवर कामचुकार शिक्षकांचा भरणा आहे. त्यांच्यासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. अशा शिक्षकांना वठणीवर आणण्याचे सोडून त्यांची इतरत्र बदली करण्यासाठी काही नगरसेवक आग्रही आहेत. निकष डावलून बदली प्रक्रिया राबविण्याचा परिणाम सर्व ३२ शाळांवर होणार हे निश्चित मानल्या जात आहे. अशावेळी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

नगरसेवकांची दिशाभूल!
मागील दोन वर्षांत मनपा प्रशासनाने बदल्या केल्यामुळे काही कामचुकार शिक्षकांची कोंडी झाली असून, ज्या प्रभागात घर असेल, त्या प्रभागात नजीकच्या शाळेतच बदली करून घेण्यासाठी काही शिक्षक सरसावले आहेत. प्रशासन नियमावली दाखवून बदली रद्द करणार, या विचारातून थेट लोकप्रतिनिधी व नगरसेवकांकडे धाव घेऊन त्यांना विणवण्या केल्या जात आहेत. बदलीसाठी तर्कहीन सबब सादर करून लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात आहे. अशा शिक्षकांप्रती लोकप्रतिनिधींसह मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी अत्यंत स्पष्ट व रोखठोक भूमिका घेण्याची गरज वर्तविली जात आहे.

 

Web Title:  Corporators' setting for transfers of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.