कोल्हापुरी बंधारा सात दिवसांत दुरुस्त करा!
By Admin | Published: November 10, 2014 01:18 AM2014-11-10T01:18:11+5:302014-11-10T01:18:11+5:30
शेतक-यांचा अकोला जिल्हा प्रशासनाला इशारा.
वाडेगाव (अकोला) : येथील निर्गृणा नदीवरील कोल्हापुरी बंधार्याची दुरवस्था झाली असून, गळती होत असल्याने बंधारा कोरडा पडला आहे. सिंचनास पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी येत्या सात दिवसांत बंधार्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
निर्गृणा नदीवरील कोल्हापुरी बंधार्याची गत २0 वर्षांत कधीही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दरवर्षी या बंधार्यातून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. वास्तविक पाहता या बंधार्यामुळे परिसरातील १0 ते १५ गावातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. तसेच परिसरातील विहिरींची पातळी टिकून राहण्यासाठीही हा बंधारा उपयुक्त आहे. परंतु, संबंधित विभागाचे या बंधार्याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. तसेच पाणी वापर संस्थाही निष्क्रिय असल्याने आजरोजी या बंधार्याची दुरवस्था झाली आहे. बंधार्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रशासनाने येत्या सात दिवसांत बंधार्याची दुरुस्ती करून निर्गृणा धरणातील पाणी या बंधार्यात सोडावे. अन्यथा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.