मनपा कर्मचाऱ्यांचा अग्रिम रकमेच्या समायाेजनाला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:17 AM2021-04-13T04:17:41+5:302021-04-13T04:17:41+5:30
महापालिकेत प्रशासकीय कामे निकाली काढताना विभागप्रमुख तसेच कर्मचाऱ्यांना ऐनवेळेवर अग्रिम रकमेची गरज भासते. अग्रिम रकमेची उचल केल्यानंतर तीन महिन्यांच्या ...
महापालिकेत प्रशासकीय कामे निकाली काढताना विभागप्रमुख तसेच कर्मचाऱ्यांना ऐनवेळेवर अग्रिम रकमेची गरज भासते. अग्रिम रकमेची उचल केल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत संबंधित रकमेच्या खर्चाचे समायोजन करणे अपेक्षित आहे. तसे न करता मनपातील स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध कामकाजासाठी अग्रिम रकमेची उचल केल्यानंतर मागील आठ ते दहा वर्षांपासून समायोजन केले नसल्याची बाब समाेर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत स्थायी समितीचे तत्कालीन सभापती सतीश ढगे यांनी कर्मचाऱ्यांच्या जुन्या फायली बाजूला सारत समायोजन न................... करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. याप्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी वित्त व लेखा विभागाला अग्रिम रकमेची उचल केलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले हाेते. त्या अनुषंगाने लेखा विभागाने नोटिसा बजावल्या हाेत्या. त्यानंतर पुढे कोणतीही कारवाई किंवा समायोजनाची प्रक्रिया न झाल्यामुळे वित्त व लेखा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
लेखा विभागावरच घेतला आक्षेप!
मनपा प्रशासनाने नोटीस जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी समायोजनासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. दुसरीकडे पहिल्या रकमेची उचल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी समायोजन केले नसेल तर अशा कर्मचाऱ्यांना लेखा विभागाने दुसऱ्यांदा अग्रिम रक्कम का मंजूर केली, असा सवाल उपस्थित करून काही कर्मचाऱ्यांनी लेखा विभागाच्या कामकाजावरच आक्षेप घेतला आहे. हा प्रकार म्हणजे ‘उलटा चाेर काेतवाल काे डाटे’ असा असल्याचे बाेलले जात आहे.
प्रामाणिकता संशयाच्या घेऱ्यात
मनपा कर्मचाऱ्यांनी अग्रिम रकमेचे मागील अनेक वर्षांपासून समायोजन न केल्याने उचल केलेल्या रकमेतून नेमक्या कोणत्या कामांवर खर्च झाला, याचा आज रोजी कोणताही थांगपत्ता लागत नसल्याची माहिती आहे. आधी घेतलेल्या अग्रिम रकमेचे समायोजन न करता पुन्हा दुसऱ्या रकमेची उचल केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेवर शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. याप्रकरणी आयुक्त निमा अराेरा काय निर्णय घेतात याकडे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.