नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार
By admin | Published: November 23, 2014 01:18 AM2014-11-23T01:18:31+5:302014-11-23T01:18:31+5:30
तेल्हारा येथील नागरिकांचे जिल्हाधिका-यांना निवेदन.
तेल्हारा : येथील बसस्थानक ते साई मंदिरापर्यंत सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार, अनियमितता झाली असून, सदर काम इस्टीमेटनुसारच करण्यात यावे, असे निवेदन तेल्हारा येथील गजानन मलिये व चंद्रकांत मोरे यांनी १९ नोव्हेंबरला जिल्हाधिकार्यांना दिले. शहरात नगरोत्थान योजनेंतर्गत बस स्थानक ते साई मंदिरापर्यंत काँक्रीट रस्त्याच्या सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार होत असून, सदर काम हे नियमानुसार व्हावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर काम इस्टीमेटनुसार ७४ लाख ९0 हजार ९00 रुपयांचे आहे. सदर रस्त्यावर गिट्टी, गोटे, मुरूम, रेती, बारीक रेती, ग्रॅव्हल व पाणी टाकून रोलरने दबाई करून काम झाले नाही आणि जुन्या डांबरी रस्त्यावरील पोपडे काढण्यात आले. सदर कामामध्ये पूर्णा नदीची रेती वापरावी, असा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु रस्ता बांधकाम करताना नदीऐवजी नाल्यातील मातीमिश्रीत रेती वापरण्यात येत आहे व जी गिट्टी वापरावयास पाहिजे ती न वापरता दुसरीच गिट्टी वापरली जात आहे. त्यामुळे सदर सिमेंट रस्ता नियमानुसार करावा, अशी मागणी गजानन मलिये, चंद्रकांत मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. मात्र न. प. तेल्हाराचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांनी सिमेंट रस्त्याचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार चालू असून या कामात कुठलाच गैरप्रकार नसल्याचे म्हटले आहे.