रस्त्यांच्या कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर; आता कारवाईकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:29 PM2018-10-26T14:29:44+5:302018-10-26T14:30:28+5:30

शासन निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली असली, तरी यासंदर्भात संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

corupction in roads work; Now look at the action | रस्त्यांच्या कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर; आता कारवाईकडे लक्ष!

रस्त्यांच्या कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर; आता कारवाईकडे लक्ष!

Next


अकोला : शहरातील सहा काँक्रीट रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) घेण्यात आलेल्या नमुन्यांचा तपासणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केला असून, त्यामध्ये सहाही रस्ते कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासन निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली असली, तरी यासंदर्भात संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शासनामार्फत उपलब्ध निधीतून करण्यात येणारी रस्त्यांची कामे गुणवत्तेप्रमाणे पूर्ण होणे आवश्यक असताना गत वर्षभरात अकोला शहरात करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यांवर वर्षभरातच ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे निर्दशनास आल्याने, शहरातील रस्ते कामांचे सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढला. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणात गत २२ ते २७ जुलै दरम्यान शहरातील अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक, माळीपुरा ते मोहता मिल नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालय आणि अशोक वाटिका ते सरकारी बगीचा इत्यादी सहा काँक्रीट रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले होते. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग अकोला उपविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा प्रयोगशाळा या तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे ७९ नमुने घेण्यात आले होते. या रस्ते कामांच्या नमुने तपासणीचा संबंधित तीन यंत्रणांकडून प्राप्त झालेला अहवाल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २४ आॅक्टोबर रोजी जाहीर केला. त्यानुसार ‘सोशल आॅडिट’ करण्यात आलेल्या शहरातील सहाही रस्ते कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची बाब उघड झाल्याने शासन निधीतून शहरातील संबंधित काँक्रीट रस्त्यांच्या कामातील गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब झाले. रस्ते कामांतील खाबूगिरी चव्हाट्यावर आली असली, तरी या सर्व प्रकाराला जबाबदार असणाºयांविरुद्ध संबंधित यंत्रणा म्हणून महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे यासंदर्भात महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधित अधिकारी, अभियंत्यांसह कंत्राटदारांविरुद्ध काय कारवाई करण्यात येते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

मनपा, सा.बां. विभागाने ‘या’ रस्त्यांची केली कामे!
‘सोशल आॅडिट’मध्ये शहरातील सहा रस्ते कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आढळून आला. त्यापैकी अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, मुख्य डाक ते सिव्हिल लाइन चौक, माळीपुरा ते मोहता मिल आणि अशोक वाटिका ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय या पाच रस्त्यांची कामे महागरपालिकेमार्फत (मनपा) करण्यात आली आहेत, तर नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय ते सरकारी बगीचा या दोन रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहेत.
 

शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या शहरातील रस्ते कामांचे सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षण करण्यात आले. त्यामध्ये रस्ते कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आढळून आल्याने, यासंदर्भात दोषी असलेले संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
-डॉ. रणजित पाटील,
पालकमंत्री.


‘सोशल आॅडिट’मध्ये शहरातील रस्ते कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आढळून आल्याने, यासंदर्भात दोषी असलेल्या संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई झाली पाहिजे. रस्ते कामांच्या दर्जासंदर्भात तत्कालीन मनपा आयुक्तांसह संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले, हेदेखील विसरून चालणार नाही.
-रणधीर सावरकर,
आमदार, अकोला पूर्व.

 

Web Title: corupction in roads work; Now look at the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.