पीक लागवडीचा खर्चही निघणार नाही; शेतकरी चिंतेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:18 PM2019-11-03T14:18:10+5:302019-11-03T14:18:14+5:30
सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे
- संतोष येलकर
अकोला : पावसाळा संपल्यानंतर महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे पीक लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र परतीचा पाऊस बरसणे सुरूच आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत परतीच्या पावसाने कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. पात्या-फुलेही गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाल्याच्या स्थितीत पिकांच्या पेरणी ते काढणीपर्यंत लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पीक लागवडीचा असा आहे एकरी खर्च!
यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस सुरू असल्याने पीक लागवडीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामध्ये पेरणी, डवरणी, निंदण, कीटनाशकांची फवारणी आणि कापणीपर्यंत सोयाबीन पिकाच्या लागवडीवर एकरी १३ ते १५ हजार रुपये, कपाशी पिकाच्या लागवडीवर एकरी २० ते २२ हजार रुपये आणि ज्वारी पिकाच्या लागवडीवर एकरी ६ ते ७ हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावा लागला; परंतु परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याचे वास्तव आहे.
शेतकºयांना आता मदतीची आस!
परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून किती आणि केव्हा मदत मिळणार, याबाबत संकटात सापडलेल्या शेतकºयांना आता आस लागली आहे.
परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाले आहे. पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने सरसकट एकरी २५ ते ३० हजार रुपये मदत दिली पाहिजे.
-शिवाजीराव भरणे,
शेतकरी, रामगाव, ता. अकोला.