खड्डेमय रस्त्यांनी वाढवला एसटीचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:27+5:302021-09-10T04:25:27+5:30
अकोला : पावसाळ्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांसह अंतर्गत रस्त्यांचीही पुरती वाट लागली असून, बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. जनतेच्या सेवेसाठी ...
अकोला : पावसाळ्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांसह अंतर्गत रस्त्यांचीही पुरती वाट लागली असून, बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. जनतेच्या सेवेसाठी सतत रस्त्यावर धावत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांचे खड्ड्यांमुळे प्रचंड नुकसान होत असून, अशा रस्त्यांमुळे एसटीच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. एवढेच नव्हे, तर खराब रस्त्यामुळे तेल्हारा ते जळगाव जामोद ही बससेवा गत अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाकाळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यानंतर हळूहळू बससेवा सुरळीत झाली आहे. तरीही, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने एसटीची आर्थिक ओढाताण होत आहे. अशातच जिल्ह्यातील पाचही आगारांमधून धावणाऱ्या बसगाड्यांना खराब रस्त्यांचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बसगाड्या खिळखिळ्या झाल्या असून, पूर्वीच्या तुलनेत लवकरच या गाड्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. शिवाय, अपेक्षित गतीवर वाहन चालत नसल्याने इंधनाचीही खपत अधिक होत आहे. त्यामुळे एसटीला मोठा खर्च करावा लागत आहे.
जिल्ह्यातील आगार आणि सुरू असलेल्या बस
आगार बस
अकोला १ ३०
अकोला २ ३२
अकोट ३०
मूर्तिजापूर २०
तेल्हारा २०
तेल्हारा ते जळगाव जामाेद बसफेऱ्या बंद
जिल्ह्यातील सर्वच मार्गांची चाळण झाली असली, तरी या रस्त्यांवरून बस चालूच आहेत. कोविडकाळात ग्रामीण भागातील बसेस अजूनही सुरू झालेल्या नाहीत. तथापि, रस्ता खराब असल्यामुळे तेल्हारा ते जळगाव जामोद या मार्गावरील फेऱ्या गत अनेक दिवसांपासून बंद आहेत.
ग्रामीण भागातील बसेस बंदच
कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील फेऱ्या बंदच आहेत. ग्रामीण भागातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने बसफेऱ्या सुरूच झाल्या नाहीत. जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. तथापि, कोरोनामुळे आधीपासूनच ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने खड्ड्यांमुळे ही सेवा बंद असल्याचे म्हणता येणार नाही, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटीचा खर्च वाढला
जिल्ह्यातील पाचही आगारांमधील बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात गत काही महिन्यांपासून मोठी वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे टायर लवकर खराब होत आहेत. शिवाय, गाडीच्या चेसिसचे मोठे नुकसान होते. खिडक्या, दरवाजेही खिळखिळे होत असल्याने ते बदलण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक गाड्यांमधील आसनेही खिळखिळी झाली आहेत. यामुळे एसटीचा खर्च वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे आधीच अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने उत्पन्न घटले आहे. आता ऑफ सिझन असल्याने त्यात
भरच पडली आहे. खराब रस्त्यांमुळे बसगाड्या खिळखिळ्या होत असून, देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. त्यानंतरही एसटीने अपवाद वगळता अखंडित सेवा सुरू ठेवली आहे.
-चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक, अकोला