‘कॉटन ब्रोकर’ कैलास थाडास जन्मठेप
By admin | Published: September 22, 2016 01:51 AM2016-09-22T01:51:56+5:302016-09-22T01:51:56+5:30
शरीरसुखास नकार देणा-या महिलेची केली होती जाळून हत्या.
अकोला, दि. २१- कामावर असलेल्या मजुराच्या बायकोने शरीरसुखास नकार दिल्यानंतर तिला जिवंत जाळणार्या ह्यकॉटन ब्रोकरह्ण कैलास धाडास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिने कैदेच्या शिक्षेचे आदेश दिले.
अकोल्यातील कॉटन ब्रोकर कैलास रामेश्वर थाडा (४८) याच्याकडे एक कर्मचारी कामावर होता. कामावरील कर्मचार्याच्या अहमदनगर येथील नातेवाइकाचा मृत्यू झाल्याने तो पत्नी व मुलांना घेऊन १६ फेब्रुवारी २00८ रोजी गावी जाण्याची तयारी करीत होता; मात्र यावेळी कैलास थाडा याने कर्मचार्यास बाहेरगावावरून कापसाचे नमुने आणण्यासाठी पाठविले. कर्मचारी कापसाचे नमुने आणण्यासाठी निघताच थाडा हा कर्मचार्याच्या घरी गेला. घरी असलेल्या कर्मचार्याच्या मुलाला गाडी दुरुस्त करण्यासाठी त्याने बाहेर पाठविले. त्यामुळे घरात तो आणि त्या कर्मचार्याची पत्नी हे दोघेच होते. काही वेळातच थाडाने त्या महिलेला शरीरसुखाची मागणी केली; परंतु महिलेने त्याला विरोध केला. तरीही त्याने जबरदस्ती केल्याने महिलेने त्याच्याशी वाद घालून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या कैलास थाडा याने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. महिलेची आरडाओरड ऐकून शेजारी तेथे पोहोचले त्यांनी महिलेला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यानंतर उपचारासाठी महिलेस रुग्णालयात दाखल केले, यावेळी थाडाही त्यांच्या सोबत होता. त्याने जखमी महिलेला माझे नाव सांगितल्यास तुझ्या मुलांना जीवाने मारेल, अशी धमकी दिली. हेच बयान त्या महिलेने पोलिसांना दिले .९६ टक्के जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान २२ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी नरेंद्र ओमप्रकाश खत्री (४५) यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम आकोत यांनी सुरू केला. प्रकरण वेगळे असल्याचे तपासात त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ठाणेदार सुनील सोनोने यांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर हे हत्याकांड समोर आले. पोलिसांनी कैलास थाडा यास अटक केली. या प्रकरणाची सुनावणी मुख्य व जिल्हा सत्रन्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात झाली. त्यांच्या न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासल्यानंतर कैलास थाडा यास खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेश दिले.