‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:41 PM2019-11-26T13:41:06+5:302019-11-26T13:41:06+5:30
कापूस खरेदीचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी अमरावती येथून केला जाणार आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : आधारभूत किमतीने कापूस खरेदी करण्यासाठीची महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जय्यत तयारी केली असून, ४० ऐवजी आता ५० खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. २१ खरेदी केंद्रे हे विदर्भात असतील. कापूस खरेदीचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी अमरावती येथून केला जाणार आहे. दरम्यान, कापूस खरेदीसाठी शासनाकडून पणन महासंघाला व्याजाने रक्कम दिली जाते. ती दिली की नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
यावर्षी मान्सूनपूर्व कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. आता खरीप कपाशीची वेचणी सुरू असून,अनेक भागात उतारा घटला आहे. बाजारात दरही घटले आहेत. आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५,४५० ते ५,५५० रुपये आहे. याच पृष्ठभूमीवर शेतकरी पणन महासंघाची खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु पणन महासंघ भारतीय कापूस महामंडळाचा उपअभिकर्ता आहे. त्यामुळेच राज्य शासनाकडून ‘पणन’ला ५० कोटी रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. त्या रकमेच्या भरवशावर पणन महासंघातर्फे कोटेशन काढून जी बँक कमी व्याजात मोठी रक्कम देईल त्या बँकेत ५० कोटी जमा करू न पाच म्हणजे दोनशे ते २५० कोटी कर्ज काढून कापूस खरेदी केली जाते; परंतु शासनाने ही रक्कम दिली की नाही, हे अनुत्तरित आहे.
असे असले तरी पणन महासंघाने ५० खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सुरुवातीला ४० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नागपूर विभागात ५, वणी २, अकोला २, अमरावती ५, खामगाव २, यवतमाळ ५, औरंगाबाद ५, परळी ५, परभणी २, नांदेड २ व जळगाव विभागात ५ खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
- कपाशी खरेदी करण्यासाठीची पूर्तता झाली असून, २७ नोव्हेंबरला अमरावती येथून खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. २८ नाव्हेंबरपासून उर्वरित ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
राजाभाऊ देशमुख,
अध्यक्ष,
पणन महासंघ.
कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडून व्याजाने पैसे घ्यावे लागतात. ते पैसे बँकेत ठेवून पाच पट रक्क म घ्यावी लागते; परंतु आता काय करण्यात आले, हे सांगता येत नाही.
डॉ.एन.पी. हिराणी,
माजी अध्यक्ष,
पणन महासंघ.