कापसाला मिळत आहे चार हजारावर भाव

By admin | Published: April 3, 2015 02:27 AM2015-04-03T02:27:18+5:302015-04-03T02:27:18+5:30

शेतक-‍यांजवळचा कापूस संपला; वाढलेले भाव व्यापा-‍यांच्या हिताचे.

Cotton is getting four thousand rupees | कापसाला मिळत आहे चार हजारावर भाव

कापसाला मिळत आहे चार हजारावर भाव

Next

नाना हिवराळे /खामगाव : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी व रूईच्या भावामध्ये वाढ झाल्याने कापसाची मागणी वाढली आहे. पर्यायाने कापसाच्या भावातही क्विंटलमागे ३00 ते ४00 रूपये दराने वाढ झाली आहे; परंतु सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या घरातच कापूस नसल्याने या वाढत्या भावाचा फायदा केवळ व्यापार्‍यांना होणार असल्याचे दिसून येते.
पांढर्‍या सोन्याकडे शेतकर्‍यांचे हमी पीक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात गारपीट, नैसर्गिक आपत्ती आणि अत्यल्प पावसामुळे कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच बाजारातही कपाशीला शेतकर्‍यांच्या अपेक्षाएवढा भाव मिळत नसल्याने कपाशीचे पीक घेणे परवडेनासे झाले आहे. यावर्षीच्या २0१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३ हजार ९५0 ते ४ हजार ५0 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व भारतीय कपास निगम (सीसीआय) यांच्यावतीने कपाशीची खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होती. खामगाव हे कापसाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने येथे कपाशीची नेहमीच विक्रमी आवक असते. यावर्षी पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. मार्च अखेर पणन महासंघाची जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. तर सीसीआयच्यावतीने खामगाव, नांदुरा, मलकापूर व जळगाव जामोद या चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. एकट्या खामगाव केंद्रावर सीसीआयने ३ लाख ५४ हजार ४३७ क्विंटल कापूस खरेदी केली. शेतकर्‍यांचे ऑनलाईन पेमेंट होऊन शेतकर्‍यांना कापसाचे १४१ कोटी ५४ लाख ४५ हजार ६७0 रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना ४ हजार ७५0 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव यावर्षी मिळालाच नाही. गतवर्षी पाच हजारापेक्षा जास्त भाव कापसाला मिळाला होता. शेतकर्‍यांच्या घरातील कापूस विकल्यानंतर आता मात्र कापसाचे भाव वाढले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रुपये प्रतिक्विंंटल कापसाला भाव मिळत आहे; परंतु जवळपास ९५ टक्के शेतकर्‍यांच्या घरातून कापूस हद्दपार झाला आहे. शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकर्‍यांनी पडेल भावात कापूस विकला आहे. ३ हजार ५00 ते ३ हजार ६00 रुपये दराने शेतकर्‍यांनी कापूस विकला; मात्र आता ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाढत्या भावाचा शेतकर्‍यांना फटका बसला असून, वाढलेला भाव व्यापार्‍यांच्या पथ्यावर पडणारा आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांना वाढत्या भावापासून वंचित राहावे लागले आहे.
 

Web Title: Cotton is getting four thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.