कपाशी, मक्यावर आता ‘फॉल आर्मी’चे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:30 PM2019-06-05T14:30:10+5:302019-06-05T14:30:16+5:30
अकोला: कपाशी व मका पिकावर आता ‘फॉल आर्मीवर्म’ नवीन लष्करी अळीच्या आक्रमणाची शक्यता वाढली असून, या अळीच्या व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यूपीएल कंपनीसोबत सामंजस्य करार केला.
अकोला: कपाशी व मका पिकावर आता ‘फॉल आर्मीवर्म’ नवीन लष्करी अळीच्या आक्रमणाची शक्यता वाढली असून, या अळीच्या व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यूपीएल कंपनीसोबत सामंजस्य करार केला. एकात्मिक कीड व्यवस्थापन व फवारणीद्वारे फॉल आर्मीचे संकट हद्दपार करण्यासाठीच हा करार करण्यात आल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली.
कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले असले तरी स्वस्थ बसून चालणार नाही. मागील दोन वर्ष कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. कामगंध सापळ््याचा फायदा यासाठी झाला. तथापि, बोंडअळीचे कोष सुप्तावस्थेत राहतात तसेच जिनिंग फॅक्टरीत, फरदड व पूर्व हंगामी पेरणी केलेल्या कपाशीवर जास्त प्रादुर्भाव दिसतो. यासाठीच गत दोन वर्षांपासून पूर्व हंगामी कापूस शेतकऱ्यांनी घेऊच नये यासाठीचे प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहेत. बीटी कपाशीचे बियाणेदेखील त्याचमुळे उशिरा बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत. आता मात्र नवीन ‘फॉल आर्मी’ लष्करी अळीचे संकट निर्माण झाले आहे. ही अळी मका पिकावर आढळून आली. या अळीचा प्रसार केव्हाही कपाशीवर होण्याची शक्यता असल्याने त्यासाठीच्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. यूपीएल व कृषी विद्यापीठाने एकत्र काम करू न यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जाणार असून, कामगंध सापळेही उपलब्ध केले जाणार असल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले.
या उपक्रमाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील बोदगधन
व अकोला जिल्ह्यातील पाटखेड येथून केली जाणार आहे. तसेच मका पिकासाठी बुलडाणा जिल्ह्यतील दोन गावांची निवड करण्यात आली आहे. ही दोन गावे मॉडेल म्हणून निवडली आहेत. येथेच सर्वंच आवश्यक प्रात्यक्षिक घेतले जातील, असेही डॉ. भाले यांनी सांगितले. सामंजस्य करारावर यूपीएलचे ग्लोबल हेड सागर कौशिक, विभाग संचालक समीर टंडन, डॉ.अजित कुमार, प्रतापराव रणखांब, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.व्ही.के. खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे आदींची उपस्थिती होती.