अकोटच्या कापूस बाजारपेठेत कापसाला ५ हजार ५६५ चा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:48 AM2018-01-01T00:48:59+5:302018-01-01T00:53:11+5:30
अकोला: यावर्षी कापसाचा हंगाम बोंडअळीमुळे संकटात आला आहे. बोंडअळीमुळे कापसाची प्रत कमी झाल्याने त्याचा परिणाम भावावर झाला; मात्र अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षीही इतर ठिकाणच्या तुलनेत कापसाला अधिक भावाची परंपरा जपली. या हंगामात अकोटच्या कापूस बाजारपेठेत प्रतिक्विंटलला ५५६५ एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. हा भाव विदर्भात सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: यावर्षी कापसाचा हंगाम बोंडअळीमुळे संकटात आला आहे. बोंडअळीमुळे कापसाची प्रत कमी झाल्याने त्याचा परिणाम भावावर झाला; मात्र अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षीही इतर ठिकाणच्या तुलनेत कापसाला अधिक भावाची परंपरा जपली. या हंगामात अकोटच्या कापूस बाजारपेठेत प्रतिक्विंटलला ५५६५ एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. हा भाव विदर्भात सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सध्या कापसाला ४७00 ते ५२00 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळत आहे. सध्या अकोट बाजार समितीत दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमधील कापसाच्या गाड्यांची मोठीच मोठी रांग, कापूस विक्रीच्या लिलावात चढय़ा भावाने बोलली जाणारी बोली.. अलीकडच्या दशकभरात कापसासंदर्भात असे आश्वासक चित्र अभावानेच पाहायला मिळाले. बोंडअळीमुळे यावर्षीचा कापूस हंगाम काळवंडला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला कापूस उत्पादक अधिक सैरभैर झाला; मात्र अकोटची कापूस बाजारपेठ सध्या कापसाने चांगलीच फुलून गेली आहे. याला कारण आहे, येथे कापसाला मिळत असलेला चांगला भाव अन् तत्काळ मिळणारा चुकारा. त्यामुळे सध्या अकोटच्या बाजारपेठेत दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. या हंगामात अकोटच्या कापूस बाजारपेठेत विदर्भात प्रतिक्विंटलला ५५६५ एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. येथे सरासरी ५१00 ते ५५६५ पर्यंत भाव सध्या मिळत आहे. खिशात दोन पैसे जास्त मिळत असल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान आहे. अमरावती विभागातील अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यासह शेजारच्या मध्य प्रदेशातील शेतकरी आपला कापूस अकोटमध्ये विकायला आणत आहेत. विशेष म्हणजे, येथील कापसाची प्रतिक्विंटल पावणेसहा हजार रुपये भावाकडे वाटचाल सुरू आहे.
पाच हजार शेतकर्यांनी विकला कापूस
आतापर्यंत जवळपास पाच हजारांवर शेतकर्यांनी आपला कापूस बाजार समितीच्या माध्यमातून विकला आहे. दररोज दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत कापूस खरेदीची लिलाव प्रक्रिया राबविली जाते. शेतकर्यांचा कापूस लगेच सर्वाधिक लिलाव बोलणार्या व्यापार्यांच्या जिनिंगमधील काट्यावर मोजून त्याला लगेच पावती अन् संबंधित रकमेचा धनादेश दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया बाजार समितीच्या पुढाकाराने होत असल्याने शेतकरी विश्वासाने आपला कापूस अकोटच्या बाजार समितीत आणत आहेत.
कापसाची निर्यातही होणार!
यावर्षी ‘सीसीआय’ने कापसाच्या मध्यम धाग्याला ४0२0 तर लांब धाग्याला ४३२0 एवढा हमीभाव जाहीर केल्याने शेतकर्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. जिनिंगचे तब्बल २0 युनिट विदर्भात आहेत. येथील जिनिंगला दररोज १५ हजार क्विंटल कापसाची आवश्यकता पडते.
वर्हाडातील कापसात रुईचे प्रमाण अधिक आणि सरकीची जाडी कमी असल्याने बाजारात या कापसाला चांगलीच मागणी आहे. येथील कापूस पुढे बांगलादेश आणि चीनमध्येही निर्यात होणार आहे.
उघड लिलाव पद्धती, लगेच चुकारे, अचूक वजन-माप यामुळे शेतकर्यांची अकोट बाजार समितीला पसंती आहे. दररोज सरासरी पाच हजार क्विं टल कापसाची खरेदी होत आहे.
-राजकुमार माळवे,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.