कापूस वेचणी यंत्र तयार करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 03:43 PM2020-01-18T15:43:47+5:302020-01-18T15:43:58+5:30
स्मार्ट’मधून निधी प्राप्त झाल्यास या कृषी विद्यापीठाला हे यंत्र तयार करू न त्याचा व्यावसायिक म्हणून विकास करता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसून, वेचणीचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्राची प्रतीक्षा आहे. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हे यंत्र विकसित करण्यासाठीचे पाऊल उचलले आहे. शासनाच्या ‘स्मार्ट’ महाराष्टÑ राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत यंत्रासाठी निधीची तरतूद असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
राज्यात ४३ लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र आहे. यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे यांच्या कार्यकाळात कापूस वेचणी यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर व भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीने यासाठी निधी उपलब्ध केला होता. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत यंत्र विकासासाठी करारही करण्यात आला होता. यंत्राचे ५० टक्के कामही पूर्ण झाले होते. याअगोदर नामांकित कंपन्यांच्या यंत्राद्वारे कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर वेचणी प्रात्यक्षिकही घेण्यात आले. तथापि, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नंतर याकडे दुर्लक्ष झाले; परंतु आता मजुरांची वानवा व वाढलेले मजुरीचे दर बघता, या यंत्राची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने डॉ. मायंदे यांनी यंत्रासंबंधीचा प्रकल्प शासनाला सादर केला आहे. यासाठी अनुदान, निधीची गरज आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निधीची तरतूद आहे. ‘स्मार्ट’मधून निधी प्राप्त झाल्यास या कृषी विद्यापीठाला हे यंत्र तयार करू न त्याचा व्यावसायिक म्हणून विकास करता येणार आहे. कापूस वेचणीचे दर सध्या १० रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. हे यंत्र तयार झाल्यास शेतकऱ्यांचा कापूस वेचणी खर्च अर्धा होईल, असे डॉ. मायंदे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कापूस वेचणी करण्यासाठी कापूस पेरणीची पद्धत बदलावी लागणार असून, ७० टक्के कापूस एकाच वेळी वेचता यावा, तसे नियोजन करावे लागणार आहे. नवीन यंत्रामध्ये केवळ कापूसच वेचणी करता यावी, असे सेंसर लावण्यात येईल. त्यासाठी कापूस बियाणे संशोधनही करावे लागणार आहे. विदेशात मजूर नसल्याने यंत्राने कापूस वेचणी करण्यात येते. तथापि, त्यांच्याकडे एकाच वेचणीत कापूस काढला जातो. कापूस परिपक्क झाल्यानंतर त्यावर विशिष्ट प्रकारची औषधी फवारणी करू न पानगळ केली जाते. त्यानंतर यंत्राणे कापूस वेचणी करण्यात येते.
कापूस वेचणी यंत्र विकसित करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. विविध कंपन्यांसोबत यासंबंधी चर्चा झाली आहे. निधीची पूर्तता होताच काम हाती घेण्यात येणार आहे.
- डॉ. विलास एम. भाले, कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.