कापसाचे दर पोहोचले ५५00 रुपयांवर!
By admin | Published: January 7, 2017 02:41 AM2017-01-07T02:41:42+5:302017-01-07T02:41:42+5:30
कापसाच्या दरात तेजी; देशात दररोज १ लाख ४0 गाठींची आवक.
राजरत्न सिरसाट
अकोला, दि. ६- हजार व पाचशेच्या नोटाबंदीनंतरच्या ५0 दिवसांनंतरही बाजारात कापसाची आवक कमी आहे. परिणामी, कापसाच्या दरात तेजी आली असून, आजमितीस हे दर प्रतिक्विंटल ५,५00 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. देशातील कापूस बाजारात दररोज दोन लाख क्विंटल गाठींची अपेक्षा असताना सद्यस्थितीत १ लाख ४0 हजार गाठींचीच आवक आहे. निर्यात मात्र १५ लाख गाठींची झाली आहे.
यावर्षी देशात ३ कोटी ४0 लाख क्विंटल गाठी कापूस उत्पादनाची शक्यता आहे. आजमितीस बाजारात १ कोटी २२ लाख गाठींची खरेदी झाली आहे. गतवर्षी मात्र ३१ डिसेंबरपर्यंतच १ लाख २२ गाठी कापूस बाजारात आला होता. यावर्षी आतापर्यंंत सर्वात जास्त कापसाची आवक महाराष्ट्रात २७ लाख ५0 हजार गाठी झाली आहे. गुजरात राज्यात २३ लाख ७५ हजार, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत २३ लाख २५ हजार, तेलंगणामध्ये १३ लाख, आंध्र प्रदेशात ६ लाख ५0 हजार, तामिळनाडू, ओरिसा आदी राज्य मिळून तीन लाख गाठी कापूस शेतकर्यांनी विकला आहे.
कापसाची आवक बाजारात कमी आहे; पण चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशात कापसाची निर्यात सुरू झाली आहे. त्याचा परिणाम कापूस तेजीत दिसत आहे. मागच्या आठवड्या त ४,५00 ते ४,८00 रुपये प्रतिक्विंटल असलेले कापसाचे दर यामुळेच या आठवड्यात ५,५00 ते ५,८00 पर्यंत वाढले आहेत. बाजारात अपेक्षित आवक होत नसल्याने हे दर वाढल्याचे तज्ज्ञांची मते आहेत. गतवर्षी कापसाची निर्यात ४0 लाख गाठी होती. यावर्षी आतापर्यंंत १५ लाख गाठी कापूस निर्यात झाला आहे. यापुढे ४0 ते ५0 लाख गाठी निर्यातीची शक्यता आहे.
बाजारात शेतकर्यांना धनादेशाद्वारे कापसाचे चुकारे व्यापार्यांकडून केली जात आहेत; परंतु बँकेत धनादेश लवकर वटत नाहीत आणि रोकडही अपेक्षित मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्याचाच परिणाम बाजारातील कापूस आवकवर झाला आहे.
महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्राला अद्याप शेतकर्यांनी कापूस विकला नाही.
पणन महासंघाने खासगी कापूस खरेदीची मागणी शासनाकडे केली; पण पणनला परवानगी मिळाली नाही.भारतीय कापूस महामंडळाने खासगी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे.
निर्यात वाढली असून, बाजारात कापसाची आवक अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे कापसाचे प्रतिक्विंटल दर हे ५,५00 रुपयांपर्यंंत पोहोचले आहेत.
बसंत बाछुका,
कापूस उद्योजक, अकोला.