कापसाचे उत्पादन घटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:18 PM2020-01-03T12:18:27+5:302020-01-03T12:18:44+5:30
डिसेंबर व जानेवारी माहिन्यातही सतत पाऊस सुरू असून, ढगाळ वातावरणही असल्याने कापूस पिकावर परिणाम झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रतिकूल हवामान आणि पाऊस सुरू च असल्याने कापूस भिजला असून, बहुतांश भागात हिरव्या बोंडातून कापूसच बाहेर येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कापूस उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांकरवी वर्तविली जात आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा व खान्देशात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून या पिकाला पावसाचे ग्रहण लागले असून, पीक वाढीच्या अवस्थेतही सारखा पाऊस सुरू असल्याने वाढीवर परिणाम झाला. डिसेंबर व जानेवारी माहिन्यातही सतत पाऊस सुरू असून, ढगाळ वातावरणही असल्याने कापूस पिकावर परिणाम झाला आहे. कपाशीच्या झाडाला कसेतरी (बोंडे) बार आला. तथापि, या बोंडातून गत महिनाभरापासून कापूसच बाहेर येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जो कापूस बोंडातून बाहेर आला होता. तो पावसामुळे भिजला आहे. बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढला आहे.
विदर्भात १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून, कापूस पीक भिजले आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर अगोदरच ८ टक्के आर्द्रता व इतर निकष लावून कापूस खरेदी केला जात असल्याने भिजलेला कापूस शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी केला जाणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनाच कापूस विकला लागणार आहे. सध्या खासगी बाजारात कापसाचे दर वाढले आहेत; पण बाजारात या कापसाला किती भाव मिळेल, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. या सर्व विषम वातावरणामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भावही वाढला असून, कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
अवेळी पावसामुळे कपाशीची प्रत खराब होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्पादनावर तेवढा परिणाम होणार नाही. सतत पाऊस सुरू असून, ढगाळ वातावरण असल्याने बोंडे फुटण्यास उशीर होत आहे. हे वातावरण निवळून ऊन पडल्यास कापूस येईल; परंतु यावर्षी बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हे पीक जास्त दिवस ठेवता येणार नाही.
- डॉ. व्ही. के. खर्चे,
संचालक संशोधन,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.