देशात साठ लाख क्विंटल कापसाची खरेदी!
By admin | Published: December 4, 2014 01:28 AM2014-12-04T01:28:05+5:302014-12-04T01:28:05+5:30
भाव पडलेलेच; खासगी बाजारात ४५ लाख क्विंटल विक्री.
अकोला : देशात यंदा साठ लाख क्विंटल कापूस शेतकर्यांनी विकला असून, यातील १५ लाख क्विंटल कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे. महामंडळ आणि खासगी बाजारातील कापसाचे भाव सारखेच असल्याने जवळपास ४५ लाख क्विंटल कापूस शेतकर्यांनी खासगी बाजारात विकला आहे. यात १.५0 लाख क्विंटल कापूस महाराष्ट्रातील आहे.
यावर्षी कापसाला ४0५0 रू पये प्रतिक्विंटल हमीभाव केंद्र शासनाने जाहीर केला; तथापि कापूस खरेदी करताना प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने प्रत्यक्षात शेतकर्यांना ३९00 ते ३९५0 रू पये प्रतिक्विंटल भाव दिले जात असून, खासगी बाजारातही कापसाचे भाव सारखेच आहेत; पण खासगी बाजारात कापूस विक्रीची रक्कम तातडीने मिळत असल्याने शेतकर्यांची पसंत खासगी बाजारालाच आहे. म्हणूनच ३0 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्यांनी जवळपास ४५ लाख क्विंटल कापूस खासगी व्यापार्यांना विकला आहे. त्यापैकी ११.५0 लाख क्विंटल कापूस आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधील शेतकर्यांनी सीसीआयला विकला आहे.
महाराष्ट्रात कापूस खरेदीसाठी सीसीआयने कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाला उपअभिकर्ता म्हणून नेमले आहे; पण सीसीआयनेदेखील या राज्यात स्वतंत्र कापूस खरेदी केंद्रं सुरू केले आहेत. असे असले तरी या राज्यातील शेतकर्यांनी पणन महासंघाऐवजी सीसीआयलाच सर्वाधिक कापूस विकला आहे. या राज्यात सीसीआयने जवळपास १.५0 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. तर पणन महासंघाने आतापर्यंंत एक हजाराच्या जवळपास कापूस खरेदी केला आहे. गतवर्षी डीसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खासगी बाजारात कापसाचे भाव वाढले होते. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांनी भाव वाढतील, या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवला आहे; तथापि अल्पभूधारक शेतकर्यांनी कापूस विक्रीचा सपाटा लावला आहे.