‘शेड’ नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:12 AM2020-06-13T10:12:02+5:302020-06-13T10:12:12+5:30
पावसाळ्याच्या दिवसात कापूस भिजू नये, यासाठी राज्यातील शेड नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद करण्याचा आदेश कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने ४३ केंद्रांच्या प्रमुखांना ११ जून रोजी दिला आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाळ्याच्या दिवसात कापूस भिजू नये, यासाठी राज्यातील शेड नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद करण्याचा आदेश कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने ४३ केंद्रांच्या प्रमुखांना ११ जून रोजी दिला आहे. शेतकऱ्यांकडे असलेला कापूस पावसाळ्यापूर्वी
खरेदी करण्यासाठी प्रत्येक केंद्रात दर दिवशी किमान २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले. तसे न झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचा कापूस घरातच आहे. त्याच वेळी आता खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी शेड नसल्याने खरेदी बंद केली जात आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र जिनिंग प्रेसिंग युनिट सुरू झालेली नव्हती. कापूस खरेदी कामी काही जिनिंग- प्रेसिंग युनिटधारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच किरकोळ कारणाने काम बंद ठेवण्याचेही प्रकार घडले आहेत. कोणत्याही शेतकºयाचा कापूस घरात राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे शासनाने बजावले.
शेतकºयांना नोंदणीसाठी मुदतही वाढवून देण्यात आली आहे. नियोजनाप्रमाणे खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस गाड्यांची संख्या ठरवून देण्यात आली. त्यातच आता राज्यातील अनेक केंद्रात खरेदी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सीसीआयच्या अकोला जिल्ह्यातील चिखलगाव, पातूर, बार्शीटाकळी, अकोट, हिवरखेड, मूर्तिजापूर, बाळापूर, बोरगावमंजू, कानशिवणी, तेल्हारा, पारस, धामणगाव रेल्वे, येवदा, मलकापूर, खामगाव, चिखली, नांदुरा, धानोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चिमनाझरी, जलालखेडा, कळमेश्वर, नरखेड, हिंगणघाट, खरांगणा, देवळी, सेलू, वायगाव, सिंदी रेल्वे, रोहणा, मंगरूळपीर, अनसिंग, वणी, राळेगाव, घाटंजी, सिंदोळा, पांढरकवडा, दारव्हा, मोरगाव (मार्डी), वाढोणा बाजार, मुकुटबन, खैरी, समुद्रपूर (कांडली) या केंद्रांचा समावेश आहे.