ढेपचे भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:16 PM2020-02-07T12:16:12+5:302020-02-07T12:16:20+5:30
२३०० रुपये क्विंटल असलेली ढेप दोन दिवसांत थेट पाचशे रुपयांनी घसरून १८०० रुपये क्विंटलवर आली आहे.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गत दोन दिवसांत सरकी ढेपचे भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी घसरल्याने अकोला, अमरावती, खामगाव आणि जालना परिसरातील ढेपीची बाजारपेठ हादरली आहे. २३०० रुपये क्विंटल असलेली ढेप दोन दिवसांत थेट पाचशे रुपयांनी घसरून १८०० रुपये क्विंटलवर आली आहे. ढेपीचे भाव उतरल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला असला तरी अकोल्यातील दोनशे ढेप मिल उद्योजक मात्र चिंतेत पडले आहे.
गत तीन महिन्यांत सरकी ढेपीच्या दरात मोठी उलाढाल झाल्याने अनेकांना कोट्यवधींचा फटका सहन करावा लागत आहे. तीन महिन्यांआधी सरकी ढेपीचे दर ४२०० रुपये क्विंटल होते. सरकी ढेपीचे दर आटोक्यात येत नसल्याने दूध व्यावसायिकांनी आंदोलन करून दुधाचे दर वाढविले. त्यापाठोपाठ दूध कंपन्यांनीदेखील दरवाढ केली. त्यामुळे सरकी ढेपीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली. ‘एनसीडीईएक्स’नेदेखील सरकी ढेपीचा मोठा स्टॉक करून ठेवलेला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत सरकी ढेपीचे भाव २३०० रुपयांवरून घसरून थेट १८०० रुपयांवर आले आहे. सरकी ढेपीचे भाव वाढले तर दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता ढेपीचे भाव घसरले तर दुधाच्या भावात घसरण झालेली नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा पेरा जास्त असल्याने कापसातून निघणारी सरकी आणि त्यावर होणारे प्रक्रिया उद्योगही याच परिसरात आहेत. त्यामुळे अकोला, अमरावती, खामगाव आणि जालना, मराठवाडा परिसरात सरकीपासून तेल काढणारे आणि सरकीपासून ढेप काढणारे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. अकोला जिल्ह्यात दोनशे सरकी ढेपीचे उद्योग आहेत. या परिसरातून देशभरात सरकी ढेप निर्यात केली जाते; मात्र सरकी ढेपीचे भाव कोसळल्याने अकोल्यातील दोनशे उद्योजकांना जबर फटका बसला आहे.
सरकी ढेपचे भाव स्थिर राहण्यासाठी राज्य शासनाने त्यावर नियंत्रण आणावे, अन्यथा दुग्ध विक्रीचा आणि दुधाशी संबंधित सर्व उद्योग अडचणीत येतील.
-गणेश चौधरी,
पशुपालक, अकोला.