अकोला जिल्ह्यात कापसाची पेरणी ३४ टक्के आटोपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:51 PM2020-06-26T17:51:41+5:302020-06-26T17:51:53+5:30
सोयाबीनची ३९ टक्के तर कपाशीची ३४ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली.
अकोला : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांची १ लाख ३८ हजार ७३४ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. यात सोयाबीनची ३९ टक्के तर कपाशीची ३४ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली. पेरण्या करून पंधरवडा उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पावसाअभावी पिके सुकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात यंदाही कपाशी आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचे अधिक लक्ष्य आहे. यामध्ये सोयाबीनचे १ लाख ६० हजार हेक्टर, तर कपाशीचेही तेवढ्याच क्षेत्रावर नियोजन आहे. त्यापैकी सोयाबीनची आतापर्यंत ८६ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर कपाशीने ५२ हजार ४७६ हेक्टरहून अधिक क्षेत्र पूर्ण केले आहे; मात्र पेरण्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकºयांसमोर मोठे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात ही दोन्ही पिके तग धरून उभी आहेत. आणखी तीन ते चार दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास पेरणी उलटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करत आहे.