स्वाभिमानीची ‘विदर्भ’ त्यागावर परिषदेची वारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:30 PM2020-06-19T23:30:30+5:302020-06-19T23:35:01+5:30
स्वाभिमानीला मिळालेली विधान परिषदेची एक जागा विदर्भातील उमेदवारांनी केलेल्या त्यागाच्या भरवशावर असल्याची चर्चा आता स्वाभिमानीत रंगत आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण केली होती. या आघाडीच्या जागा वाटपात चार जागांवर अडून बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केवळ एका जागेवर समाधान मानत विदर्भातील मतदारसंघाचा त्याग केला होता. आघाडीसाठी मतदारसंघ सोडण्याच्या मोबदल्यात विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल, अशी तडजोड तेव्हा स्वीकारली होती, असे खुद्द राजू शेट्टी यांनीच जाहीर केल्यामुळे स्वाभिमानीला मिळालेली विधान परिषदेची एक जागा विदर्भातील उमेदवारांनी केलेल्या त्यागाच्या भरवशावर असल्याची चर्चा आता स्वाभिमानीत रंगत आहे.
राज्याच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सध्या राजकारण तापले आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस या पक्षांमध्ये प्रत्येक चार या जागांवरून राजी-नाराजीचे नाट्य असतानाच राष्टÑवादीने आपल्या कोट्यातील एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे निश्चित केले आहे. या जागेवर स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचीच वर्णी लागणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाल्यानंतर स्वाभिमानी संघटनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. जिवाभावाच्या पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांच्या संभाव्य आमदारकीबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे व्यथित झालेल्या शेट्टी यांनी ही जागा मिळविण्यामागील अनेक कारणे जाहीरपणे दिली आहेत. त्यामध्ये एक कारण लोकसभा निवडणुकीत केलेल्या तडजोडीचेही आहे.
लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीकडे सहा जागा मागितल्या होत्या; मात्र त्यांचा आग्रह हा हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबतच होता. राजू शेट्टींसाठी हातकणंगले या मतदारसंघासोबतच विदर्भातील वर्धा या मतदारसंघात माजी मंत्री सुबोध मोहिते तर बुलडाणा या मतदारसंघावर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठीच दावा होता. हे दोन्ही मतदारसंघ आघाडीकडे गेल्यामुळे स्वाभिमानीची कोंडी झाली. जागा वाटपाच्या बोलणीत अंतिम टप्यात हातकणंगले व बुलडाणा या दोन मतदारसंघांवरच चर्चा थांबली होती. त्यावेळी शरद पवार यांनीच एक जागा सोडण्याचा या मोबदल्यात विधान परिषदेची एक जागा देण्याचा शब्द दिला होता. हे खुद्द शेट्टी यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिषदेची एक जागा मिळण्यामागे विदर्भातील मतदारसंघाचा त्याग असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शेट्टी यांच्या विधान परिषद उमेदवारीबाबत विदर्भातून कोणतीही नाराजी जाहीरपणे नसली तरी स्वाभिमानीच्या अंतर्गत वर्तुळात कुजबुज सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.