दहावीची परीक्षा, कलमापन चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:40 PM2019-03-30T13:40:40+5:302019-03-30T13:41:33+5:30
अकोला: कलमापन चाचणी आणि इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेमध्ये करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत आहे
अकोला: कलमापन चाचणी आणि इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेमध्ये करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत आहे. २९ मार्च रोजी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, अमृतकलश विद्यालय खडकी येथे विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आणि श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेण्यात आली होती. या कलमापन चाचणीचा निकाल १६ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये दहावीतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणते करिअर निवडायचे, शैक्षणिकदृष्ट्या कोणती शाखा निवडायची, याविषयी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या कक्षामध्ये कलमापन चाचणी व अभिक्षमता चाचणीविषयी सविस्तर समुपदेशनास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजतादरम्यान दररोज करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कृषी, कला, मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रासह, विद्यार्थ्यांची आवड व कल लक्षात घेता, समुपदेशन करण्यात येणार आहे. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गटसाधन केंद्र येथे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, विभाग प्रमुख डॉ. समाधान डुकरे यांच्या मार्गदर्शनात अधिव्याख्याता व समुपदेशक नीता जाधव, हेमंत पदमने हे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी समुपदेशनाचा लाभ घ्यावा. (प्रतिनिधी)
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा कलमापन चाचणीचाही निकाल लागला असून, या निकालाच्या आधारे आमच्याकडील समुपदेशन कक्षामध्ये विद्यार्थी, पालकांना मोफत करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध आहे.
-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य.