बनावट दारूचा साठा जप्त
By admin | Published: June 29, 2017 12:53 AM2017-06-29T00:53:57+5:302017-06-29T00:53:57+5:30
खदान पोलिसांची कारवाई; दोन महिलांसह तिघे ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत खदान येथे बनावट दारूचा साठा ठेवलेल्या ठिकाणावर खदान पोलिसांनी छापा टाकून बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला. ही कारवाई खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी बुधवारी रात्री केली असून, बनावट दारू तयार करणे आणि त्याला सीलिंग करण्याचे काम या ठिकाणावर होत असल्याचे उघड झाले आहे.
खदान परिसरातील संजय मुळे याच्या मदतीने सचिन हिरामन रोकडे याने बहीण व आईला सोबत घेत देशी आणि विदेशी बनावट दारूची लेबलिंग आणि पॅकिंग मशीनच्या साहाय्याने पॅकिंग सुरू केली होती. गत चार ते पाच दिवसांपूर्वीच त्याने हा गोरखधंदा सुरू केल्याने केवळ पॅकिंग आणि लेबलिंगचेच काम सुरू होते.त्यानंतर मोठा साठा विक्रीसाठी काढण्यात येत होता; मात्र त्यापूर्वीच खदान पोलिसांना या गोरखधंद्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणावर छापा मारून दोन महिलांसह तिघांनाही ताब्यात घेतले. घटनास्थळावरून तब्बल एक लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली असून, लेबलिंग व सील करण्याचे अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. बनावट दारूची मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले असून, ही दारू मध्य प्रदेशातून आणून खदान परिसरातील एका घरात त्याची लेबलिंग आणि सील करून नंतर विक्री करण्यात येत असल्याचे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर उघड झाले आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात खदान पोलिसांनी केली.
एमपीतून येतेय बनावट दारू
खदान परिसरातील या दोन महिला आणि एक पुरुष मध्य प्रदेशातून बनावट दारू आयात करतात.त्यानंतर सदर दारूच्या बॉटल तयार करून त्याला लेबलिंग आणि सील करण्याचे काम करण्यात येते. हा प्रकार खदान पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर बनावट दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून दारूचा मोठा साठा जप्त केला.
बॉम्बे स्पेशल व्हिस्की
मध्य प्रदेशात बॉम्बे स्पेशल व्हिस्की ही बनावट दारू असल्याची माहिती आहे. या दोघांनी ही दारू आयात करून ती रॉयल स्टॅग, ग्रीन लेबल, इम्पेरियल ब्लू, मॅकडोल्स या विदेशी दारूच्या खाली बाटल्यांमध्ये भरून त्याची मशीनद्वारे पॅकिंग सुरू केली होती.