मोजणी, भूसंपादन प्रक्रियेस ३० जूनपासून प्रारंभ होणार!

By admin | Published: June 29, 2017 12:55 AM2017-06-29T00:55:26+5:302017-06-29T00:55:26+5:30

नांदेड-अकोला राष्ट्रीय महामार्ग : पातूर तालुक्यातील नऊ गावांतून जाणार!

Counting, land acquisition process will start from June 30! | मोजणी, भूसंपादन प्रक्रियेस ३० जूनपासून प्रारंभ होणार!

मोजणी, भूसंपादन प्रक्रियेस ३० जूनपासून प्रारंभ होणार!

Next

संतोषकुमार गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : नांदेड ते अकोला मार्गे हिंगोली, वाशिम या २०० कि.मी. लांबीच्या १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पातूर तालुक्यातील नऊ गावांतील जमीन मोजणी तथा भूसंपादन प्रक्रिया ३ ए अधिसूचनेनुसार ३० जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
त्यासाठी पातूर तालुक्यातील शिर्ला, नांदखेड, जिराईत, पातूर, बागायत पातूर, अथराई पातूर, चिंचखेड, बोडखा, माळराजुरा, सावरखेड या गावांमधील ८१.५४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. हा महामार्ग पातूर तालुक्यातून १९.९०० कि.मी. लांबीचा जाणार आहे. ३ ए अधिसूचनेनुसार, उपरोक्त नऊ गावांतील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामासाठी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख पातूर यांच्याकडे भूसंपादन अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी ३४ लाख ९९ हजार रुपये रकमेचा भरणा केला आहे.
सडक परिवहन व महामार्ग मंत्रालयाची (भारत सरकार) ३ ए २ डिसेंबर २०१६ ची अधिसूचना राज्य सरकारच्या संमतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती यांच्याकडून उपरोल्लेखित गावनिहाय कृषक, अकृषक जमिनीचे संपादन करण्याकरिता गट क्रमांक तथा संपादन करावयाच्या क्षेत्रासह प्रस्ताव प्राप्त झाल्यामुळे गावपातळीवरील रेकॉर्डवरून तपासणी ३ ए चा मसुदा तयार करण्यात आला होता, तो यापूर्वीच मंजूर झाला आहे. या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग सल्लागार म्हणून मारे टेक्नोक्रॉप्ट प्रा. लि. या कंपनीची भारत सरकारने निवड केली असून, सदर कंपनीने सर्वेक्षण तथा आरेखण आराखडा तयार केला आहे.
सदर २०० कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया हिंगोली व पातूर तालुका वगळता पूर्ण झाली आहे. ५५० हेक्टर जमीन सदर महामार्गासाठी संपादित झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, एकूण ६४० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. ८० टक्के संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निविदा सूचना काढण्यात येईल. सध्या डी.पी.आर. पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. या महामार्गात येणाऱ्या रेल्वे ब्रिजच्या उभारणीसह २०० कि.मी. लांबीच्या महामार्गासाठी २२०० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. अकोला ते वाशिम जिल्ह्यादरम्यान इंग्रजांच्या काळात लावण्यात आलेली कोणतीही झाडे न तोडता झाडांना मध्यभागी घेऊन महामार्ग दोन्ही बाजूंनी बांधला जाईल.
या महामार्गाच्या भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया ३० डिसेंबर २०१७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल. निविदा सूचना आणि कार्यारंभ आदेश मार्च २०१८ पूर्वी निर्गमित करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन आहे.

Web Title: Counting, land acquisition process will start from June 30!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.