३0 टेबलवर होणार मतमोजणी!
By admin | Published: February 5, 2017 02:01 AM2017-02-05T02:01:16+5:302017-02-05T02:02:07+5:30
पदवीधर मतदारसंघ निवडणूक; ५00 अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक
संतोष येलकर
अकोला, दि. ४- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे करण्यात येणार आहे. ३0 टेबलवर मतमोजणी होणार असून, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायकांसह विभागातील पाचही जिल्ह्यातील ५00 अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघात अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी पाचही जिल्ह्यातील २८0 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतदार संघातील एकूण २ लाख १0 हजार ४९१ मतदारांपैकी १ लाख ३३ हजार ५८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक रिंगणातील १३ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. ३0 टेबलवर मतमोजणी होणार असून, मतमोजणीसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायकांसह ५00 अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून करण्यात आली आहे. या मतमोजणीमध्ये मतपेट्यांमध्ये सीलबंद झालेल्या मतदारसंघातील १३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
निकालाची उत्कंठा शिगेला!
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. मतमोजणीनंतर जाहीर होणार्या निवडणूक निकालात निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार, याबाबत मतदारसंघातील उमेदवारांच्या सर्मथक, कार्यकर्त्यांसह पदवीधर मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.
मतमोजणीसाठी नेमणूक केलेले असे आहेत अधिकारी-कर्मचारी!
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरावती विभागीय आयुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. तसेच मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक म्हणून महसूल विभागांतर्गत विभागीय उपायुक्त पाचही जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक इत्यादी संवर्गातील अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.