देशाला ग्रामगीतेची गरज- बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 01:58 PM2020-02-03T13:58:10+5:302020-02-03T13:58:28+5:30
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते.
अकोला : देशाला गीतेची नाही तर ग्रामगीतेचीच गरज आहे. आजच्या युवकांना ग्रामगीता समजली पाहिजे, राष्ट्रसंतांचे विचार त्यांच्या डोक्यात भिनले पाहिजे. हे महान कार्य हाती घेऊन हे साहित्य संमेलन अविरत सुरू आहे. लोकवर्गणीतून सुरू असलेले हे विचार साहित्य संमेलन अधिक कृतिशील बनवण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीद्वारा आयोजित सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते. सेवा समितीच्या या कार्याला बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या. या सेवा मंडळाच्या कार्याची स्तुती करीत राष्ट्रसंतांचे विचार अधिक व्यापक करण्यासाठी या संमेलनाला अधिक व्यापक करण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या विचारावरच आपण कार्य करीत असल्याचे ते म्हणाले. आपण मंत्री नसून, आपला सेवक असल्याचे उद्गार काढताच सभामंडप टाळ्यांच्या गजरात कडाडून गेले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, संदीपपाल महाराज, संमेलनाध्यक्ष रामदास चोरडे गुरुजी, मनपा स्थायी समिती सभापती विनोद मापारी, माधव राऊत, सावळेगुरुजी, सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, प्रहारचे मनोज पाटील, तुषार फुंडकर, कपिल ढोके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन मोहोकार यांनी केले. आभार गोपाल गाडगे यांनी मानले.