लंडनधील दाम्पत्याने केली अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:13 PM2019-03-01T13:13:25+5:302019-03-01T13:15:18+5:30
सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याने ब्रह्मवृंदांकडून अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा मांडली.
अकोला: विज्ञान-तंत्रज्ञानाचं युग आहे. बाजारपेठेतील सर्वच प्रकारच्या वस्तू आॅनलाइन मिळत असताना, देवही कसा मागे राहील...आता देव, त्यांची पूजासुद्धा आॅनलाइन होऊ लागली आहे. मूळचे अहमदनगर येथील आणि सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याने ब्रह्मवृंदांकडून अकोल्यातील रेणुका देवीची आॅनलाइन पूजा मांडली. या आॅनलाइन पूजेची सर्वत्र चर्चा होत आहे. आधुनिकतेच्या जगात, देव, धर्मालाही तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे.
लंडन शहरात राहणारे आयटी कन्सलटंट जयेश मंजुरे, प्राजक्ता मंजुरे, मुलगा रिवान यांची रेणुका देवीवर श्रद्धा असल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात पूजा करण्याचे होते. दरम्यान, रेणुका माता मंदिराच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून अकोल्यातील जुने शहरातील रेणुका देवी मंदिराचे पुजारी अनंत शुक्ल गुरुजी यांच्यासोबत ओळख झाली. मंजुरे यांनी देवीची पूजा मांडण्याचा त्यांचा संकल्प व्यक्त केला. आम्ही तर लंडनमध्ये; परंतु पूजा करायची कशी, असा प्रश्न उपस्थित झाला. शुक्ल गुरुजी यांनी त्यांना आॅनलाइन पूजा करण्याचा सल्ला दिला. जयेश मंजुरे यांनी लगेच तो मान्य केला आणि बुधवारी दुपारी मोबाइलद्वारे आॅनलाइन पूजा मांडण्यात आली. लंडनमधील घरात बसून मंजुरे दाम्पत्याने अकोल्यातील रेणुका देवीची मनोभावे पूजा मांडली. या पूजेमध्ये अनंत शुक्ल यांच्यासह आशुतोष शुक्ल, लौकिक चिटणवीस, अमित कुळकर्णी व विद्यासागर जवादे यांनीही सहभाग घेऊन वेद मंत्रोपचारात ही पूजा पार पडली. मोबाइलवर आॅनलाइन झालेली देवाची पूजा ही पहिलीच पूजा असल्याचा दावा अनंत शुक्ल यांनी केला आहे.