न्यायालयाने फरार घोषित केलेल्या दोन आरोपींना आठ वर्षांनंतर अटक
By admin | Published: January 8, 2017 02:44 AM2017-01-08T02:44:12+5:302017-01-08T02:44:12+5:30
बाश्रीटाकळी तालुक्यातील हाणामारी प्रकरणातील आरोपी; नावे बदलून राहत होता.
अकोला, दि. ७- बाश्रीटाकळी तालुक्यात २00८ मध्ये घडलेल्या हाणामारी प्रकरणातील आठ वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. सदर दोन्ही आरोपी विविध नावे बदलून वेगवेगळय़ा शहरांमध्ये तसेच खेड्यात राहत असल्याची माहिती आहे. या दोन्ही आरोपींची योग्य ओळख नसल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना फरार घोषित केले होते.
बाश्रीटाकळी तालुक्यातील सुकळी येथे फेब्रुवारी २00८ मध्ये एका लग्न समारंभात रोकडे नामक इसमासोबत बाळापूर येथील रहिवासी आकाराम राऊजी इंगोले व पळसी येथील रहिवासी रमेश ओंकार कांबळे यांचा वाद झाला होता. यावेळी कांबळे व इंगोले या दोघांनी संगनमताने रोकडे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी रोकडे यांनी बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये सदर दोघांविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आकाराम इंगोले आणि रमेश कांबळे या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर बाश्रीटाकळी पोलीस या दोन आरोपींना अटक करण्यासाठी त्यांच्या गावात गेले होते; परंतु दोन्ही आरोपी गावातून फरार झाले होते. पोलिसांनी या मारहाण प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. दोषारोपपत्र सादर केल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले; मात्र सदर दोन्ही आरोपी न्यायालयासमोर आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना फरार घोषित करून त्यांच्याविरोधात घोषणापत्र जाहीर केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठीचा अटक वारंट न्यायालयाने जारी केला. या प्रकरणातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात राजेश वानखडे, मंगेश मदनकार यांनी केल्यानंतर दोन्ही आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. या दोन आरोपींमधील आकाराम इंगोले (५८) या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी तब्बल आठ वर्षांनंतर भरतपूर येथून अटक केली तर रमेश काबंळे (४५) हा हरिहरपेठ येथे बंडू कांबळे या नावाने राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला हरिहरपेठ येथून अटक केली. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना बाश्रीटाकळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाश्रीटाकळी पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी भादंविच्या कलम १७४ नुसार आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.