आयुक्तांसह चौघांना न्यायालयाची नोटिस
By admin | Published: July 3, 2017 01:44 AM2017-07-03T01:44:42+5:302017-07-03T01:44:42+5:30
शिक्षक पदोन्नतीप्रकरणी मुख्याध्यापकाची याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पदोन्नती सेवाज्येष्ठता रोस्टरप्रमाणे नसल्याचा आरोप करणारी रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. याप्रकरणी बाजू ठेवण्यासाठी महापालिकेचे आयुक्त, पदोन्नती देण्यात आलेल्या शिक्षिका, मागासवर्गीयांचे विभागीय आयुक्त आणि महापालिका शिक्षणाधिकारी यांना नोटिस बजाविण्यात आली आहे. आगामी १३ जुलै रोजी याप्रकरणी स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
महापालिकेतील जुने शहरातील शाळेत मुख्याध्यापक असलेल्या नरेशकुमार बाबुलाल मूर्ती यांनी सेवाज्येष्ठता रोस्टरमध्ये नाव डावलल्याची तक्रार आधी महापालिका प्रशासनाकडे केली होती. सेवाज्येष्ठतेत आणि आरक्षणात नसताना एका शिक्षिकेला ही संधी देण्यात आल्याचा आरोप करीत मुख्याध्यापक मूर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि आर.बी. देव यांच्या न्यायालयात १७४६ अन्वये रिट पिटिशन दाखल केली. त्यावर न्यायालयाने मनपा आयुक्तांसह उपरोक्त चौघांना याप्रकरणी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या एका मुख्याध्यापकाने रिट पिटिशन दाखल केल्याने महापालिकेच्या शिक्षण वर्तुळात खळबळ माजली आहे.
सेवाज्येष्ठता आणि रोस्टरप्रमाणेच महापालिकेतील शिक्षकांना पदोन्नती दिली गेली आहे. कायदेशीररीत्या महापालिकेची बाजू भक्कम आहे. महापालिका न्यायालयात स्पष्टीकरण सादर करणार आहे.
-समाधान सोळंके, उपायुक्त, महापालिका अकोला.