आर्थिक गुन्हे शाखेची याचिका न्यायालयाने फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 06:43 PM2019-04-15T18:43:35+5:302019-04-15T18:43:48+5:30
जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
अकोला: सिटी कोतवाली पोलिसांनी २०१७ मध्ये अनुप आगरकर यांच्या तक्रारीवरून अनुप डोडिया व ११ जणांविरुद्ध अवैध सावकारी व फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असताना डोडिया यांच्या बचावासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव आणण्यात येत असल्याचा संदर्भ देऊन जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
अनुप आगरकर यांच्या प्रकरणात अनुप डोडिया यांनी तपासात सहकार्य केले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणातून तपास अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव आणण्यात आला होता. तशा प्रकारची नोंदही घेण्यात आल्याची माहिती आहे. याच कारणामुळे आर्थिक गुन्हे शाखेने तपासात सहकार्य होत नसल्याचे कारण समोर करीत तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन येत असून, दबाव आणण्यात येत असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गणेश अने यांनी अनुप डोडियाची जामीन रद्द करण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती; परंतु न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनुप डोडिया यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणात पोलीस पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचे दिसत आहे.