मूर्तिजापुरात लोकसहभागातून उभारले जातेय कोविड केअर सेंटर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:39+5:302021-05-21T04:19:39+5:30
दिवसेंदिवस कोरोना संसर्ग बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मूर्तिजापूर शहर व तालुक्याला कोविड सेंटरची व्यवस्था कमी पडू नये व ...
दिवसेंदिवस कोरोना संसर्ग बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मूर्तिजापूर शहर व तालुक्याला कोविड सेंटरची व्यवस्था कमी पडू नये व कोरोनाबाधितांची गैरसोय होऊ नये, म्हणून मूर्तिजापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करून तालुक्यातील रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू केले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. मात्र सद्यस्थितीत असलेल्या या व्यवस्थेवर ताण पडू नये व कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढायला लागली तर व्यवस्था अपुरी पडू नये, यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांसह नगरपरिषदेच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेतील नवीन दोनमजली इमारतीत २५ बेड खालील मजल्यावर व २५ बेड वरच्या मजल्यावर अशा पन्नास बेडची व्यवस्था करण्याचा संकल्प केला आहे.
शिक्षकांसह न.प. पदाधिकारी लागले कामाला
नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी यांनी इमारतीतील इलेक्ट्रिक व्यवस्था व पाण्याची व्यवस्था, तसेच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यातील शिक्षक बांधवांनी बेडची व्यवस्था करण्याचा संकल्प केला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेंटरची देखरेख व रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर औषधोपचार करण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यातील व शहरातील दानशूर व्यक्तींनी सुद्धा कोविड सेंटरसाठी मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसहभागातून कोविड सेंटरची उभारणी होत आहे. कोरोनाबाधितांना वेळेवरच बेड उपलब्ध झाले पाहिजेत, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीत ५० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न होत आहे
- अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी
कोरोना रुग्णांसाठी नगरपरिषदेची नवीन सुसज्ज इमारत उपलब्ध करून देऊन, याठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. या कामात शहरातील दानशूरांनी सुद्धा मदतीसाठी पुढे यावे.
- मोनाली कमलाकर गावंडे,
नगराध्यक्षा, मूर्तिजापूर