जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर सज्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:34 AM2020-09-29T11:34:37+5:302020-09-29T11:34:44+5:30
या ठिकाणी आॅक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अकोला: कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने खाटांची संख्याही वाढविली जात असून, जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. येथील कोविड केअर सेंटरची तयारी अंतिम टप्प्यात असून, या ठिकाणी आॅक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत; मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून आयुर्वेद महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रत्येकी शंभर खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, आयुर्वेद महाविद्यालयात ५० खाटांची व्यवस्था करून ते रुग्णसेवेत सुरू करण्यात आले आहे. तर जिल्हा स्त्री रुग्णालयात पहिल्या टप्प्यात ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, आॅक्सिजन सुविधाही सज्ज करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. लवकरच येथील कोविड केअर सेंटर कोविड रुग्णांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
कोविड सेंटर महिलांसाठी राखीव!
जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र आपत्कालीन परिस्थिती पाहता अद्यापही त्यावर काही अधिकाऱ्यांची सहमती झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तयारी होऊनही हे सेंटर रुग्णसेवेत सुरू झाले नसल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.
कोविड केअर सेंटरसाठी नवीन इमारतीमध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, खाटांची संख्या आणखी वाढविली जाणार आहे. सोबतच आॅक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.