कोविड केअर सेंटर्स कुलूपबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:04+5:302021-08-12T04:23:04+5:30
कोविडची दुसरी लाट ओसरली असून, जिल्ह्यात नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे ...
कोविडची दुसरी लाट ओसरली असून, जिल्ह्यात नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होऊन ४९ वर आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांत काेविडचे रुग्ण नसल्याने ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रातही सर्वोपचार रुग्णालय वगळता इतर ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने सर्वच कोविड केअर सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.
कुठे पडला कचरा, तर कुठे डासांचा प्रादुर्भाव
अकाेला : शहरातील गुणवंत वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी स्वच्छता असली, तरी वसतिगृहाच्या परिसरात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. संभाव्य तिसरी लाट सप्टेंबर महिन्यातच येणार असल्याचा काही तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत बंद पडलेल्या कोविड केअर सेंटर्सच्या परिसरात स्वच्छतेची गरज आहे.
देवरी फाटा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देवरी फाटा परिसरातही कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. रुग्ण नसल्याने हे कोविड केअर सेंटरही सद्यस्थितीत कुलूपबंद स्थितीत आहे. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करण्यात आलेली कोविड केअर सेंटर्स बंद झाली आहेत. तिसरी लाट आल्यास ही सेंटर्सही पुन्हा सुरू करण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे या सेंटर्सची देखरेख करण्याची गरज आहे.
या बंद सेंटरना वाली कोण?
कोरोना काळात प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. सद्यस्थितीत हे कोविड केअर सेंटर बंद असून त्याकडे कुणी फिरकूनही पाहत नाही. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेतर्फे या कोविड केअर सेंटर्सची नियमित स्वच्छता राखण्याची गरज आहे.
कोरोनात सुरू केलेली केअर सेंटर्स - ७
सध्या सुरू असलेली केअर सेंटर्स - ०