कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘पीएचसीं’मध्ये काेविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:56 AM2021-06-07T10:56:30+5:302021-06-07T10:56:37+5:30
Covid Center in ‘PHC’ : प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर (पीएचसी) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.
- संतोष येलकर
अकोला: कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर (पीएचसी) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद आरोगामार्फत नियोजन करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या आता कमी होत असली तरी, कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, तिसऱ्या लाटेत बालक आणि युवकांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुषंगाने कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ‘पीएचसी’ स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय ‘पीएचसीं’ची अशी आहे संख्या!
तालुका पीएचसी
अकोला ६
अकोट ४
तेल्हारा ४
बाळापूर ४
पातूर ५
बार्शीटाकळी ४
मूर्तिजापूर ४
.................................................
एकूण ३१
कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
डाॅ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद