सुपरस्पेशालिटी रुग्णालयात २५० खाटांचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:10+5:302021-05-08T04:19:10+5:30
अकोला : येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, असे ...
अकोला : येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, असे आदेश महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या झूम मीटिंगमध्ये वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना हे आदेश दिले असून, याकामी अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि अकोला जिल्हाधिकारी यांची मदत घेण्याची सूचनाही देशमुख यांनी केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सध्या ४५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू आहे. यापैकी ६० खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत, मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने तातडीने २५० खाटांचे नवे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश यावेळी दिले असे ढाेणे यांनी नमूद केले आहे. या नियोजित कोविड रुग्णालयातील २५० खाटांपैकी ५० खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच नर्सेस स्थानिकरीत्या नेमण्यात यावेत आणि तातडीने या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात यावे असे आदेश दिल्याचे ढाेणे यांनी सांगितले.