खासगी रुग्णालयातून आजपासून कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 10:57 AM2021-03-03T10:57:28+5:302021-03-03T10:57:36+5:30
CoronaVaccine जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातून आजपासून लसीकरण करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातून लसीकरण आज (दि. ३) पासून करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दुसरा टप्प्या सुरू करण्यात आला असून यात ६० वर्षांवरील वयोवृद्ध व ४५ वरील वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याबाबतची खासगी लसीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्यचिकित्सक तथा प्रभारी उपसंचालक आरोग्य डॉ. राजकुमार चव्हान, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, डॉ. अश्विनी खडसे, डॉ. अनुप चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातून लसीकरण आज (दि. ३) पासून करण्यात येणार आहे. यात संत तुकाराम हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, माऊली मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल, डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पिटल, श्रीमती बी. एल. चांडक रिसर्ज फाऊंडेशन (वसंती हॉस्पिटल) आणि शुक्ला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनस्पॉट नोंदणीसुद्धा करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांनी लसीकरणाच्या जागी सामाजिक अंतर, मास्क वापर व सॅनिटाईज करणे या त्रिसूत्रीय नियमाचे पालन करावे. येणाऱ्या व्यक्तीसाठी केंद्रावर ऑक्सिजन सिलिंडर व उपचारासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी. प्रत्येक व्यक्तीला लसीकरण झाल्यानंतर अर्ध्या तास निरीक्षणाखाली ठेवावे. लसीकरण झालेल्या व्यक्तींना २५ तासाच्या आत ताप येणे, डोके दुखणे व हात जड होणे यासारखे लक्षणे दिसण्याची शक्यता असते. याबद्दलची माहिती देण्यात यावी. खासगी लसीकरण केंद्रांनी लसीचा गैरवापर होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.