अकोला जीएमसीवर पुन्हा वाढला कोविडचा भार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 10:51 AM2021-02-16T10:51:32+5:302021-02-16T10:51:39+5:30
Akola GMC रुग्णसंख्येत वाढ झाल्याने मागील पाच दिवसांतच रुग्णालय प्रशासनाला तीन वॉर्ड वाढवावे लागले.
अकोला : गत आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने गत पाच दिवसांत सर्वोपचार रुग्णालयातील तीन कोविड वॉर्ड वाढविण्यात आले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील मनुष्यबळ कमी पडत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर पुन्हा कोविडचा भार वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यानंतर कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहावयास मिळाली. परिणामी जिल्ह्यातील जवळपास सर्वच कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नाहीत, अशा रुग्णांचा घरीच उपचार सुरू झाला. त्यामुळे अतिरिक्त ठरणारे कंत्राटी मनुष्यबळ एकाएकी कमी करण्यात आले. शिवाय, सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डची संख्याही केवळ ३ वर आणली. दरम्यानच्या काळात नॉनकोविड वॉर्डही सुरू करण्यात आले.त्यामुळे बहुतांश मनुष्यबळ नॉनकोविड रुग्णसेवेत व्यस्त झाले. अशातच जानेवारीपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. मागील आठवडाभरात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने दिसू लागला. सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याने मागील पाच दिवसांतच रुग्णालय प्रशासनाला तीन वॉर्ड वाढवावे लागले. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळ कमी पडू लागल्याने आरोग्य विभागाची चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढत असूनही सुरक्षेबाबतची सतर्कता वाढलेली दिसत नाही. त्यामुळे परिस्थिती अशीच कायम राहिली तर मार्च महिन्यापर्यंत आणि मार्चनंतर रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोकाही नाकारता येत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
१७ रुग्ण अतिदक्षता विभागात
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कायम असून सद्यस्थितीत सर्वोपचारच्या सहा वाॅर्डांमध्ये एकूण सुमारे १४० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १७ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
मनुष्यबळ अपुरे, कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी
जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते, मात्र आता पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचा भार जीएमसीवर येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाची टंचाई भासत आहे. एकाचवेळी अनेक रुग्ण दाखल झाल्याने नियोजन कोलमडण्याचा धोका आहे. दरम्यान, यापूर्वी सर्वोपचारला कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्यात आले होते. त्यामुळे कंत्राटी मनुष्यबळ पुन्हा पुरविण्यात यावे, अशी मागणीही अधिकाऱ्यांकडून होत आहे.