पुन्हा वाढू शकतो कोविडचा ग्राफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 10:51 AM2020-10-19T10:51:36+5:302020-10-19T10:55:02+5:30
Akola CoronaVirus गत दोन दिवसात पॉझिटिव्ह अहवालांची संख्या वाढली आहे.
अकोला : राज्यात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी वापरण्यात आलेल्या जुन्या किट सदोष असल्याचे समोर आल्यानंतर या किटचा वापर थांबविण्यात आला होता. त्या ऐवजी नवीन किटचा वापर सुरू झाला असून, गत दोन दिवसात पॉझिटिव्ह अहवालांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा आलेख पुन्हा वाढू शकतो, असा अंदाज वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले; मात्र ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच रुग्णसंख्या वाढीची गती मंदावली. शिवाय, बाधितांची संख्याही झपाट्याने कमी होऊ लागली. पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली होती. अशातच आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या किट सदोष असल्याने त्याचा उपयोग थांबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे नवीन किटचा चाचणीसाठी वापर केला जात आहे. परिणामी पॉझिटिव्ह अहवालाची संख्या ४० वर आली. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची आणखी एक लाट येण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे; मात्र या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट बोलण्यास टाळले आहे.