CovidWarrior : मम्मी, हवं तर मी येते सोबतीला, आपण दोघी कोरोनाला फिनिश करू!
By atul.jaiswal | Published: May 27, 2020 11:38 AM2020-05-27T11:38:14+5:302020-05-27T11:47:45+5:30
हे बोबडे पण तेवढेच खंबीर बोल आहेत आपल्या कोविड योद्धा आईला भेटण्यासाठी गत दीड महिन्यांपासून कासावीस झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचे.
- अतुल जयस्वाल
अकोला : ‘मम्मी आता रात्र झाली...पेशंटला गोळ्या देऊन झाले असेल ना...? ते आता झोपले असतील, तू परत ये...! नाही तर मी येऊ का तिकडे तुझ्या सोबतीला ? आपण दोघी मिळून कोरोनाला फिनिश करू...!’ हे बोबडे पण तेवढेच खंबीर बोल आहेत आपल्या कोविड योद्धा आईला भेटण्यासाठी गत दीड महिन्यांपासून कासावीस झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून सेवारत असलेल्या रूपाली पुंड-वाकोडे वॉर्ड क्र. ८ मध्ये सेवारत असतात. ‘रोटेशन’ पद्धतीने त्यांना ११ ते २४ मे या काळात कोविड - आयसीयू कक्षात ‘ड्युटी’ देण्यात आली. कोविड वॉर्डात ड्युटी लागणार म्हणून त्यांनी आधीच पूर्वतयारी करून आपली तीन वर्षांची मुलगी सानवी व पती पंकज यांना १५ एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील चिंचोली काळे या मूळ गावी पाठविले. कुटुंबाला संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत त्या तेव्हापासून ‘जीएमसी’ परिसरातील होस्टेलमध्ये राहत आहेत. गत दीड महिन्यांपासून आपल्या चिमुकलीपासून दूर राहून त्या रुग्णसेवा करत आहेत. कोविड वॉर्डात ११ ते २४ मे या कालावधीत रुग्णसेवा केल्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे सात दिवस ‘क्वारंटीन’ व्हावे लागले आहे. कोविड वॉर्डात सेवारत असतानाचा अनुभव विचारला असता, रूपाली पुंड या भावुक होतात. मायलेकीच्या ताटातुटीचे दु:ख त्यांच्या बोलण्यातून जाणवते. केवळ तीन वर्षांची असलेली सानवी दररोज व्हिडिओ कॉल केल्याशिवाय झोपत नाही. ‘आई तू कशी आहेस...? आम्ही कधी येऊ तुझ्याकडे...?’ या सानवीच्या प्रश्नांनी अश्रू अनावर होतात, असे रूपाली पुंड सांगतात.
पतीने दिला भावनिक आधार!
कोविड वॉर्डात ड्युटी लागल्यानंतर मन थोडे विचलित झाले होते; पण पती पंकज यांनी भावनिक आधार दिला. ‘सानवी, माझी व कुटुंबाची काळजी करू नको, रुग्णसेवा महत्त्वाची आहे. स्वत:ची काळजी घे.’ अशा शब्दात पंकज यांनी आधार दिल्यानंतर मनाची तयारी झाल्याचे रूपाली पुंड यांनी सांगितले.
सात दिवस ‘क्वारंटीन’
रूपाली पुंड यांची कोविड-आयसीयूमधील ‘ड्युटी’ २४ मे रोजी संपली आहे. तेव्हापासून त्यांना नियमप्रमाणे ‘क्वारंटीन’ व्हावे लागले आहे. सात दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतरही लॉकडाउनमुळे मुलगी व पतीची कधी भेट होईल, हे निश्चित नसल्याचे रूपाली पुंड सांगतात.