क्रेनची कॅप तुटली; विहिरीत पडल्याने मजुराचा मृत्यू
By admin | Published: February 15, 2016 02:35 AM2016-02-15T02:35:39+5:302016-02-15T02:35:39+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी खुर्द येथील घटना; चालकासह दोन जखमी
कुरूम (जि. अकोला): खोदकाम करण्यासाठी क्रेनच्या टपामध्ये बसून विहिरीत उतरत असताना कॅप तुटल्याने मजूर ठार झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी मूर्तिजापूर तालु क्यातील जामठी खुर्द येथे घडली. विलास महादेव अडसोड (३५, रा. जामठी खुर्द) हे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव असून, या दुर्घटनेत ब्लास्टिंग ट्रॅक्टरचा चालक दीपक भोलानाथ सूर्यवंशी (३८, रा. मधापुरी) व विक्की रामेश्वर अडसोड (२0, रा. जामठी खुर्द) हे जखमी झाले. जामठी येथील श्रीकृष्ण तानाजी नेवारे यांच्या शेतात असलेल्या विहिरीचे खोदकाम व गाळ काढण्याकरिता तीन मजूर क्रेनच्या टपामध्ये बसून उतरत होते; मात्र अचानक बेरिंग आवरण (कॅप) तुटल्याने मजूर ६0 फूट विहिरीत कोसळले. ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना बाहेर काढण्यात आले. दोन जखमींना तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच मानाचे ठाणेदार चंदू पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पद्मणे, भूषण नेमाडे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मापा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.