डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी

By Admin | Published: April 3, 2015 02:31 AM2015-04-03T02:31:01+5:302015-04-03T02:31:01+5:30

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना; परस्परांविरुद्ध तक्रारी, डॉक्टरांची पोलिसांविरोधात नारेबाजी.

Crash in doctor and patient relatives | डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी

डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी

googlenewsNext

अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचे नातेवाईक व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे प्रशिक्षु डॉक्टरांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी रात्री ११ पासून तर मध्यरात्री २ पर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या.
गांधीग्राम येथील रहिवासी प्रकाश महादेव अढाऊ गुरुवारी रात्री एका अँपेमध्ये घराकडे जात असताना त्यांच्या वाहनाला भरधाव जाणार्‍या एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे प्रकाश अढाऊ यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर उपचार करण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत अढाऊ यांच्या नातेवाइकांनी डॉ. वैशाली रामदास माटे या विद्यार्थिनीस मारहाण केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, अढाऊ यांचे नातेवाईक व काही प्रशिक्षु डॉक्टरांमध्ये हाणामारी झाली.
यामध्ये डॉ. शशिकांत मेडशीकर, डॉ. वैशाली माटे, डॉ. जुगल, डॉ. नवीन गायधने, डॉ. दळवी यांच्यासह आणखी काही विद्यार्थी जखमी झाले, तर डॉक्टरांनीही अढाऊ यांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याने प्रकाश अढाऊ यांची मुलगी, एक वृद्ध आणि आणखी चार जण जखमी झाले.
डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना मिळताच तब्बल २00 ते २५0 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रुग्णाच्या नातेवाइकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिरुद्ध अढाऊ हे पोलीस ताफ्यासह सवरेपचार रुग्णालयात दाखल झाले. विद्यार्थ्यांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करीत रुग्णाच्या नातेवाइकांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी वैशाली माटे हिने दिलेल्या तक्रारीवरून अढाऊ कुटुंबीयांविरुद्ध, तर अढाउ यांच्या तक्रारीवरून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Crash in doctor and patient relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.