अकोल्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये माती खाण्याची ‘क्रेझ’; मातीच्या पुड्यांची सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:37 PM2019-07-31T14:37:05+5:302019-07-31T14:38:26+5:30
अकोला : ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी विकतची माती खात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.
अकोला : ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी विकतची माती खात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. या मातीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळा परिसरात असलेल्या किराणा दुकानांमध्ये सर्रास विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे लक्ष देऊन मातीची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. पालक आणि शिक्षकांनी याविषयी सजग राहण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील दुकानांमध्ये मातीच्या पुड्यांची सर्रास विक्री होत आहे. या मातीमुळे फायदा होत असल्याचा चुकीचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये गेल्याने विद्यार्थी खरेदी करून त्याचे सेवन करीत आहेत. एक रुपयाला मिळत असलेली ही मातीची पुडी शाळा परिसरातील किराणा दुकानांवर सर्रास मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या मातीच्या पुड्यांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या मातीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. मातीमधील केमिकलमुळे मुलांच्या तोंडात इन्फेक्शन होत असून, आतड्यांवरही परिणाम होत आहे. पिंजर परिसरात एका मुलीचा या मातीमुळेच मृत्यू झाल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असलेल्या या मातीच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बंदी घालण्याची मागणी होत आहे. या मातीची विक्री करणाºया दुकानदारांविरुद्धही कारवाईची गरज आहे. शालेय विद्यार्थी आपल्या दप्तरात मातीच्या पुड्या ठेवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देऊन तो मातीच्या आहारी गेला का, याची खातरजमा करून त्याला त्यापासून परावृत्त करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी मातीच्या पुड्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करीत आहेत. जवळपास ७० टक्के विद्यार्थी मातीचे सेवन करीत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे शिक्षक आणि पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. मातीची विक्री करणाºया दुकानदारांवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
- दीपक सदाफळे, संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक, पिंजर.