‘महासंस्कृती महोत्सव’चा परिपूर्ण आराखडा तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

By संतोष येलकर | Published: January 5, 2024 07:30 PM2024-01-05T19:30:44+5:302024-01-05T19:30:56+5:30

महासंस्कृती महोत्सव फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे नियोजन असून, त्यानुषंगाने विविध कार्यक्रमांबाबत स्वतंत्र उपसमित्या तयार करून त्याद्वारे परिपूर्ण आराखडा निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Create a perfect plan for the Mahasanskrit Mahotsav Instructions of Collector | ‘महासंस्कृती महोत्सव’चा परिपूर्ण आराखडा तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

‘महासंस्कृती महोत्सव’चा परिपूर्ण आराखडा तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

अकोला : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रदेशांतील संस्कृतीचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अकोला येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव आणि श्री शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त महानाट्याचे आयोजन लवकरच केले जाणार आहे. या कार्यक्रमांचा परिपूर्ण आराखडा तयार करून नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी दिले. महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महापालिका उपायुक्त गीता वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, समन्वय अधिकारी गजानन महल्ले, ज्योती नारगुंडे, सीमा शेट्ये, दिलीप देशपांडे, सचिन गिरी, पुष्पराज गावंडे, प्रशांत होळकर आदी उपस्थित होते.

महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम होणार असून, श्री शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच भारूड, गोंधळ, पोवाडा, खडी गंमत, कोळीगीत, लोककलेतील विविध प्रकार, स्थानिक कलाप्रकार, नाटक, कवी संमेलन, व्याखानमाला अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्यामध्ये स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम प्राधान्याने समाविष्ट करण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. महासंस्कृती महोत्सव फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे नियोजन असून, त्यानुषंगाने विविध कार्यक्रमांबाबत स्वतंत्र उपसमित्या तयार करून त्याद्वारे परिपूर्ण आराखडा निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
 
महानाट्याचा स्वतंत्र आराखडा सादर करा!
श्री शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त महानाट्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार असून, त्यादृष्टीनेही स्वतंत्र आराखडा सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कुंभार यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले.

Web Title: Create a perfect plan for the Mahasanskrit Mahotsav Instructions of Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला