शालेय गुणवत्ता वाढीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:09 PM2019-04-03T15:09:31+5:302019-04-03T15:09:42+5:30
अकोला: शाळेची गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा, मूल्यशिक्षणावर भर देऊन शिक्षकांकडून उत्तम कार्य करून घेण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे आणि शालेय गुणवत्ता वाढीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी दिले.
अकोला: शाळेची गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा, मूल्यशिक्षणावर भर देऊन शिक्षकांकडून उत्तम कार्य करून घेण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे आणि शालेय गुणवत्ता वाढीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी दिले.
माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने मंगळवारी सकाळी रालतो विज्ञान महाविद्यालयात आयोजित प्राचार्य, मुख्याध्यापकांच्या सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विजय नानोटी, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, विजुक्टाचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, मुख्याध्यापक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप कडू आदी होते.
आयुष प्रसाद म्हणाले, शाळेत मूल्यशिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. मूल्यशिक्षणातूनच विद्यार्थ्यांची जडणघडण होते. मुख्याध्यापकांनी विद्यार्थी व शिक्षकांमधील दुवा म्हणून काम करताना चांगल्या गोष्टी रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी शालेय गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार असल्याचे सांगत, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या योजना, शिष्यवृत्ती परीक्षा, वेतनेतर अनुदानाबाबत सतर्क राहून शिक्षण विभागाला सहकार्य करावे, असे मत व्यक्त केले. आढावा बैठकीमध्ये दुष्काळसदृश भागातील विद्यार्थ्यांची माहिती, मतदार जागृती मंच, वेतनेतर अनुदान निर्धारण, मॉस्टर फाइल, स्वीप कक्ष, २0१८-१९ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त, रिक्त पदांची माहिती, पवित्र पोर्टलव्यतिरिक्त रिक्त पदांची माहिती, शिल्लक बिंदू नामावली, शाळांचे प्रस्ताव आदी विषयांवर सविस्तर चर्चा करून मुख्याध्यापक, प्राचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी केले. संचालन डॉ. रवींद्र भास्कर यांनी केले. सभेला जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांसह उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार व दिनेश तरोळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दोन हजार कापडी पिशव्यांचे मुख्याध्यापकांना वितरण
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी तयार केलेल्या दोन हजार कापडी पिशव्यांचे जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना वितरण करण्यात आले. प्राप्त झालेले शुल्क हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना देण्यात येणार आहे. कापडी पिशव्या खरेदी करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची शिक्षण विभागामार्फत मदत करण्यात येणार असून, वितरित करण्यात आलेल्या कापडी पिशव्या मुख्याध्यापकांमार्फत शाळेत विद्यार्थी व पालकांना विकत दिल्या जाणार आहेत.