कृषी, पशुसंवर्धनच्या लाभार्थी याद्या तयार करा; योजना मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:04+5:302021-09-03T04:20:04+5:30
अकोला: जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींच्या याद्या तयार करुन योजना तातडीने मार्गी ...
अकोला: जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींच्या याद्या तयार करुन योजना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरांचे वाटप, गोठा वाटप आदी योजनांसह कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींच्या याद्या तातडीने तयार करुन विहित कालावधीत योजना मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित दोन्ही विभागांना सभेत देण्यात आले. विविध योजनांतर्गत निधी खर्चाच्या मुद्यावरही या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अर्थ विभागांतर्गत गेल्या तीन महिन्यातील नोंदवह्या समितीच्या पुढील सभेत ठेवण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ समितीच्या सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला अर्थ समिती सदस्य विनोद देशमुख, पुष्पा इंगळे, गायत्री कांबे, वर्षा वजिरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ताडपत्री वाटप योजनेवर
९ लाखांनी वाढविला निधी
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांपैकी एका योजनेवरील ९ लाख रुपयांचा निधी कमी करुन विभागाच्या ताडपत्री वाटप योजनेवर वाढविण्याच्या विषयाला या सभेत मान्यता देण्यात आली. त्यानुसार कृषी विभागाच्या ताडपत्री वाटप योजनेवर ९ लाखांची तरतूद वाढविण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाह केलेल्या
दाम्पत्यांना अनुदानाचे वाटप करा
जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान वाटप अद्याप प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या पात्र दाम्पत्यांना तातडीने अनुदान वाटप करण्याचे निर्देश अर्थ समितीच्या सभेत समाजकल्याण विभागाला देण्यात आले. उपलब्ध निधीतून पात्र लाभार्थी दाम्पत्यांना अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती सभेत देण्यात आली.